मोदींना ‘झालमुरी’ खाऊ घालणाऱ्या विक्रेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या; पाक-बांगलादेशातून येताहेत फोन
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान यांना ‘झालमुरी’ खाऊ घालून चर्चेत आलेले दुकानदार विक्रम साहू यांना आता जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातून आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून सतत धमकीचे फोन येत असल्याचा दावा विक्रम साहू यांनी केला असून त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान विक्रम साहू यांच्या दुकानाला भेट देत ‘झालमुरी’चा आस्वाद घेतला होता. त्यावेळी मोदी आणि साहू यांच्यात झालेला संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेनंतर विक्रम साहू हे अचानक प्रसिद्धीझोतात आले होते. मात्र, हीच प्रसिद्धी आता त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
विक्रम साहू यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि बांगलादेशातून सतत फोन व व्हिडिओ कॉलद्वारे धमक्या दिल्या जात आहेत. फोन करणारे अश्लील भाषेत शिवीगाळ करत असून बॉम्बने उडवून देण्याची धमकीही देत आहेत. त्यामुळे कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली जगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भीतीमुळे आता अनेक अनोळखी फोन उचलणेही बंद केल्याचे साहू यांनी सांगितले.
धमकी देणारे थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेत नसले तरी मोदी यांनी त्यांच्या दुकानात ‘झालमुरी’ खाल्ल्यानंतरच या धमक्यांना सुरुवात झाल्याचा दावा साहू यांनी केला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पश्चिम बंगाल पोलिसांनी तपास सुरू केला असून विक्रम साहू यांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सरकारने स्वतःसह कुटुंबाला योग्य सुरक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
