जळगाव बाजार समितीचा ‘नवा शिलेदार’ कोण?; सस्पेन्स वाढला
मंत्री गिरीश महाजनांकडून संचालकांच्या मुलाखती; रविवारी होणार नावावर अंतिम शिक्कामोर्तब?
जळगाव :जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाभोवतीचे राजकारण अधिकच रंगत असून नव्या सभापतीच्या निवडीबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. सभापती सुनिल महाजन यांच्या विरोधात १३ संचालकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता नव्या सभापतीच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या सभापतीपदासाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू असून ‘नवा शिलेदार’ कोण असणार याबाबतचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या १८ मे रोजी सभापती निवडीची अधिकृत प्रक्रिया पार पडणार असून त्यापूर्वीच रविवारी उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर १५ मे रोजी शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बाजार समितीतील भाजपच्या १० संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्येक संचालकाशी स्वतंत्र चर्चा करत त्यांच्या भावना आणि भूमिका जाणून घेतल्या.
या बैठकीला आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे तसेच भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी उपस्थित होते. अविश्वास ठरावानंतर पक्षांतर्गत मतभेद वाढू नयेत आणि सर्वमान्य चेहरा पुढे यावा, यासाठी वरिष्ठ पातळीवरून सावध पावले उचलली जात असल्याचे दिसून आले.
दरम्यान, सभापती पदाच्या शर्यतीत लक्ष्मण पाटील, मनोज चौधरी आणि मिलिंद चौधरी यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अंतिम उमेदवार कोण असेल, याबाबत अद्यापही गुप्तता कायम ठेवण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अंतिम निर्णयापूर्वी मंत्री गिरीश महाजन हे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या सहमतीनंतरच अधिकृत नाव जाहीर होणार असल्याचे राजकीय गोटातून सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, तत्कालीन सभापती सुनील महाजन यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी आता नव्या राजकीय रणनीती आखल्या जात असून बाजार समितीच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे.
आता येत्या १८ मे रोजी सभापती पदाची अधिकृत निवड होणार असून त्यापूर्वी पुढील दोन दिवसांत कोणत्या राजकीय घडामोडी घडतात आणि अखेर ‘सभापती’ची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.