जळगाव जिल्ह्यात ४७ गावांवर टंचाईची झळ; ११ टँकर सुरू, ४१ विहिरी अधिग्रहित
जळगाव l प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून तीव्र उष्णतेची लाट कायम असल्याने भूजल पातळी झपाट्याने खाली गेली असून अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात टँकरमुक्त असलेल्या जिल्ह्यात आता परिस्थिती बदलली असून तीन तालुक्यांतील सात गावांना ११ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सुरुवातीला पाण्याची स्थिती समाधानकारक होती. मात्र मे महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी कमी होऊ लागल्याने टंचाई जाणवू लागली आहे.
प्रशासनाने सुरुवातीला भुसावळ तालुक्यातील कंडारी तसेच अमळनेर तालुक्यातील जानवे, उदयनगर आणि तळवाडे या गावांसाठी टँकर सुरू केले होते. त्यानंतर जामनेर तालुक्यातील जांभळ, वाकोद आणि वाडी किल्ला येथेही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील तीन गावांसाठी चार टँकरद्वारे दिवसभरात १२ फेऱ्या होत आहेत. भुसावळ तालुक्यात एका टँकरद्वारे दररोज चार फेऱ्या सुरू आहेत, तर अमळनेर तालुक्यात सहा टँकरच्या सहाय्याने दिवसभरात १५ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
संभाव्य टंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील सुमारे ४१ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. यामध्ये अमळनेर तालुक्यात सर्वाधिक १३ विहिरी, तर जामनेर तालुक्यात ७ विहिरी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
तालुकानिहाय विहिरी अधिग्रहण (संख्या):
जामनेर – ०७
यावल – ०१
रावेर – ०१
मुक्ताईनगर – ०९
बोदवड – ०३
पाचोरा – ०३
चाळीसगाव – ०१
अमळनेर – १३
पारोळा – ०१
चोपडा – ०२
एकूण – ४१
दरम्यान, जळगाव, धरणगाव, एरंडोल, भडगाव आणि भुसावळ येथील प्रमुख पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींमध्ये अद्याप पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी विहिरी अधिग्रहणाची गरज भासलेली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नुकतेच आवर्तन सोडण्यात आल्याने संबंधित गावांना पुढील काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
धरणगाव तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त ११ गावांसाठी अंजनी धरणातून बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात आले असून त्यामुळे गावांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. गिरणा पाटबंधारे विभागामार्फत सोडलेले पाणी विविध गावांपर्यंत पोहोचू लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.