जळगावमध्ये ACBची धडाकेबाज कारवाई; PWD अभियंता ५ लाख लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात
जळगाव : जिल्ह्यात लाचखोरीचे सत्र अद्यापही थांबताना दिसत नसून आज शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत शासकीय यंत्रणेत खळबळ उडवून दिली. एका मक्तेदाराचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता योगेश अहिरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका नोंदणीकृत कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध कामे पूर्ण केली होती. या कामांचे लाखो रुपयांचे बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करून देण्यासाठी कंत्राटदाराने शाखा अभियंता योगेश अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बिल मंजुरीसाठी थेट १५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित मक्तेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी निष्पन्न झाली. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला.
ठरलेल्या तडजोडीनुसार पहिल्या हप्त्याची ५ लाख रुपयांची रोकड स्वीकारत असतानाच एसीबीच्या पथकाने अचानक कारवाई करत शाखा अभियंता योगेश अहिरे यांना जागीच बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे संपूर्ण शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
