१०वीत मिळाले होते इतके गुण… आज राज्याच्या सत्तेचा ‘थलपती’ !
सरासरी विद्यार्थ्यापासून सुपरस्टार आणि मुख्यमंत्रीपदापर्यंतचा विजय यांचा प्रेरणादायी प्रवास; सोशल मीडियावर १०वीची मार्कशीट व्हायरल
चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता थलपती विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने शानदार कामगिरी करत १०८ जागांवर विजय मिळवला आणि राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी विजय यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आता त्यांच्या राजकीय यशासोबतच वैयक्तिक आयुष्याचीही जोरदार चर्चा रंगू लागली आहे. अशातच विजय यांची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यात मिळालेले गुण पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजय यांनी चेन्नईतील कोडंबक्कम येथील फातिमा स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर विरुगंबक्कममधील बालालोक स्कूलमध्ये त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनात विजय हे अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात नव्हते. दहावीच्या परीक्षेत त्यांना ११०० पैकी ७११ गुण मिळाले होते. म्हणजेच त्यांची टक्केवारी सुमारे ६५ टक्के होती.
विशेष म्हणजे गणितासारख्या विषयात विजय यांना २०० पैकी फक्त ९५ गुण मिळाले होते. तर तमिळमध्ये १५५, इंग्रजीत १३३, विज्ञानात २०६ आणि सामाजिक शास्त्रात १२२ गुण मिळाले होते. ही मार्कशीट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर “सरासरी विद्यार्थी ते मुख्यमंत्री” अशी चर्चा सुरू झाली आहे.
हायस्कूलनंतर विजय यांनी चेन्नईच्या लोयोला कॉलेजमध्ये व्हिज्युअल कम्युनिकेशन कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. मात्र अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी कॉलेज शिक्षण अर्धवट सोडले. सुरुवातीला संघर्ष, टीका आणि अपयशाचा सामना करत त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या तीन दशकांत त्यांनी दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवले.
चित्रपटसृष्टीतील यशानंतर विजय यांनी राजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीतच मोठा जनाधार निर्माण केला. त्यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत सत्ता स्थापनेच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. दरम्यान, त्यांचा आगामी ‘जना नारायण’ हा चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चित्रपटात पूजा हेगडे, बॉबी देओल, प्रकाश राज आणि गौतम वासुदेव मेनन यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
थलपती विजय यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मानला जात आहे. कमी किंवा सरासरी गुण मिळाले म्हणून आयुष्य थांबत नाही. मेहनत, जिद्द आणि योग्य दिशेने सातत्याने केलेले प्रयत्न यामुळे कोणतीही व्यक्ती मोठे यश मिळवू शकते, हा संदेश त्यांच्या जीवनप्रवासातून अधोरेखित झाला आहे.