Saturday, May 9, 2026
Homeखानदेशदहावीच्या निकालात जळगाव जिल्ह्याची घसरण; ८५.२५ टक्के निकाल, मुलींनी पुन्हा मारली बाजी

दहावीच्या निकालात जळगाव जिल्ह्याची घसरण; ८५.२५ टक्के निकाल, मुलींनी पुन्हा मारली बाजी

दहावीच्या निकालात जळगाव जिल्ह्याची घसरण; ८५.२५ टक्के निकाल, मुलींनी पुन्हा मारली बाजी

धरणगाव तालुका जिल्ह्यात अव्वल; यावलचा सर्वात कमी निकाल

जळगाव | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यंदा जळगाव जिल्ह्याचा निकाल ८५.२५ टक्के लागला असून बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही जिल्ह्याची कामगिरी घसरल्याचे दिसून आले आहे. नाशिक विभागात जळगाव जिल्हा चौथ्या क्रमांकावर राहिला असून खान्देशातही जिल्हा तळाशी गेला आहे.

जिल्ह्यातील एकूण ५८ हजार ३९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५८ हजार ७८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले आणि ४९ हजार ५१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली असून मुलींचा निकाल ८९.३८ टक्के, तर मुलांचा निकाल ८२.०५ टक्के लागला आहे.
नाशिक विभागाचा एकूण निकाल ९०.५३ टक्के लागला असून त्यात नंदुरबार जिल्हा ९३.७१ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे. नाशिकचा निकाल ९२.६६ टक्के, धुळेचा ९२.०५ टक्के, तर जळगावचा ८५.२५ टक्के लागला आहे.

धरणगाव तालुका ठरला टॉपर

जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी धरणगाव तालुक्याने सर्वाधिक ९३.९९ टक्के निकालाची नोंद केली आहे. त्यापाठोपाठ जामनेर तालुक्याचा ९२.५७ टक्के आणि अमळनेरचा ९१.८८ टक्के निकाल लागला. तर यावल तालुक्याचा सर्वात कमी ७६.६९ टक्के निकाल लागला आहे.

जळगाव शहराचा निकाल ८८.२३ टक्के लागला असून मुक्ताईनगरचा निकाल ९०.७३ टक्के, पारोळ्याचा ८९.७३ टक्के, पाचोराचा ८४.२७ टक्के आणि भुसावळचा ८३.६२ टक्के लागला आहे.

विशेष प्राविण्य मिळवणाऱ्यांची संख्या निम्म्यावर
यंदा जिल्ह्यात १३ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत यश मिळवले आहे. गेल्या वर्षी ही संख्या २२ हजार ३०४ इतकी होती. त्यामुळे विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात प्रथम श्रेणीत १८ हजार ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून द्वितीय श्रेणीत १४ हजार ६८ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. तर पास श्रेणीत ३ हजार ९८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

रिपीटर्सचा निकालही घसरला

जिल्ह्यात रिपीटर्स विद्यार्थ्यांचा निकाल केवळ ४१.०७ टक्के लागला आहे. १ हजार ७४ विद्यार्थ्यांपैकी ४३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटर्स मुलींचा निकाल ५५.२१ टक्के, तर मुलांचा निकाल ३४.८२ टक्के लागला आहे.

सीसीटीव्हीमुळे निकालावर परिणाम?

यंदा दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये प्रथमच प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कॉपीप्रकरणांना मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे चित्र दिसून आले. परिणामी मेरिटमध्ये येणाऱ्या तसेच पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटल्याने निकालात सुमारे ९ टक्क्यांची घसरण झाल्याचे शिक्षण क्षेत्रातून बोलले जात आहे.

गुणपडताळणीसाठी २३ मेपर्यंत मुदत

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि छायांकित उत्तरपत्रिका मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. यासाठी ९ मे ते २३ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या