Saturday, May 9, 2026
Homeक्राईमजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजनांचा राजीनामा

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजनांचा राजीनामा

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे
सभापती सुनील महाजनांचा राजीनामा

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून सभापती सुनील महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या विरोधात १२ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेर शुक्रवारी सायंकाळी त्यांनी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

आठ महिन्यांतच गमावली सत्ता

गेल्या वर्षी २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सुनील महाजन यांनी सभापतीपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यावेळी श्यामकांत सोनवणे यांना पदावरून दूर करत महाजन गटाने सत्ता स्थापन केली होती. मात्र अवघ्या आठ महिन्यांतच त्यांच्यावर अविश्वासाची वेळ आल्याने त्यांना पद सोडावे लागले.

१२ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

सोमवारी बाजार समितीतील १८ पैकी १२ संचालकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेत महाजन यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या गटात श्यामकांत सोनवणे, लक्ष्मण पाटील, मनोज चौधरी आणि पल्लवी देशमुख यांचा समावेश असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे काही संचालकही विरोधी गटात सहभागी झाल्याने राजकीय समीकरणे अचानक बदलली.

अविश्वास प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष सभा बोलावली जाणार होती. या सभेत बहुमत सिद्ध करण्याचे मोठे आव्हान महाजन यांच्यासमोर होते. मात्र विरोधी गटाकडे स्पष्ट बहुमत असल्याचे लक्षात आल्यानंतर मतदानाला सामोरे जाण्याऐवजी त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महाजन यांच्या राजीनाम्यानंतर आता बाजार समितीच्या पुढील नेतृत्वाबाबत उत्सुकता वाढली आहे. श्यामकांत सोनवणे यांचे पुनरागमन होणार की एखादा नवा चेहरा पुढे येणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे जळगावच्या सहकार राजकारणात पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या