पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता; सुवेंदू अधिकारी आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
मोदी, शाहांसह एनडीएच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती; कोलकात्यात जल्लोषाचे वातावरण
कोलकाता | प्रतिनिधी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपने राज्यातील विधिमंडळ पक्षनेतेपदी सुवेंदू अधिकारी यांची एकमताने निवड केली आहे. यामुळे पश्चिम बंगालच्या इतिहासात प्रथमच भाजपचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून सुवेंदू अधिकारी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
भाजप विधिमंडळ दलाच्या बैठकीनंतर सुवेंदू अधिकारी यांनी थेट राजभवनात जाऊन राज्यपाल आर. एन. रवी यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. कोलकात्यातील ब्रिगेड परेड मैदान येथे सकाळी ११ वाजता भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह एनडीए आघाडीतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल आणि रूपा गांगुली यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘घुसखोरी आणि तस्करी थांबवू’ – अमित शाह
दरम्यान, भाजप विधिमंडळ दलाच्या बैठकीत बोलताना अमित शाह यांनी बंगालमधील विजयाला राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले. “राज्यात भाजपचे सरकार स्थापन होताच घुसखोरी आणि जनावरांची तस्करी रोखली जाईल. हा केवळ राजकीय विजय नसून लोकशाहीच्या पुनर्स्थापनेचा क्षण आहे,” असे शाह म्हणाले.
तसेच “भारतामधील प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हा कोणत्याही प्रकारचा ध्रुवीकरणाचा विषय नसून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
शाह यांनी यावेळी जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारधारेचा उल्लेख करत, “१९५० मध्ये सुरू झालेला विचारांचा प्रवास अखेर २०२६ मध्ये त्यांच्या जन्मभूमीत सत्तेपर्यंत पोहोचला,” असे सांगितले.
