जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते श्री क्षेत्र पद्मालय येथे महापूजा; अंगारकी चतुर्थीनिमित्त भक्तिमय वातावरण
पहाटेच्या मंगलमय वातावरणात पार पडला सोहळा; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी
जळगाव | प्रतिनिधी देशातील एकमेव डाव्या व उजव्या सोंडेच्या गणपतींचे स्थान असलेल्या श्री क्षेत्र पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने आज पहाटे उत्साहात महापूजा संपन्न झाली. जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पहाटे ४ वाजता श्री गणरायाचा अभिषेक, विधिवत पूजा आणि आरती केली.
धार्मिक विधी आणि सत्कार
पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या निमंत्रणानुसार ही पूजा पार पडली. मंदिराचे पुजारी गणेश वैद्य व केशवराव पुराणिक यांनी पौरोहित्य केले. पूजेनंतर जिल्हाधिकारी घुगे यांचा शाल आणि गणरायाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मंदिराचा इतिहास आणि सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती जाणून घेतली.
भाविकांच्या सोयीसाठी जय्यत तयारी
अंगारकी चतुर्थीनिमित्त मोठी गर्दी होत असल्याने उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन देवस्थानतर्फे चोख नियोजन करण्यात आले आहे:सावलीसाठी मंडप: भाविकांच्या रांगेसाठी संपूर्ण परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. थंड पाण्याची सोय: ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.
उपस्थित मान्यवर
या सोहळ्याप्रसंगी विश्वस्त आनंदराव पाटील, भिका पाटील, तहसीलदार गोपाल पाटील, अनिल जोशी यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.
