JCL T-20 रोमांच: चाळीसगावचा रावेरवर थरारक विजय; रावेर रॉयल्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
ओम मुंडेचा अष्टपैलू धमाका, तर जळगाव कोगटा किंग्सची जामनेरवर ‘विराट’ मात; सागर भावरची भेदक गोलंदाजी
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL T-20) मध्ये गुरुवारी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सने रावेर रॉयल्सचा पराभव करून स्पर्धेत आपले स्थान भक्कम केले, तर रावेर रॉयल्सला या पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. दुसऱ्या बाजूला जळगाव कोगटा किंग्सने जामनेर सातपुडा हिरोजचा ११९ धावांनी धुव्वा उडवत आपला दबदबा कायम राखला.
चाळीसगावचा डोंगर आणि रावेरची झुंज
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत १८३ धावांचा डोंगर उभा केला. सुरुवातीला लोकेश पाटील स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार ओम मुंडे आणि साहिल गायकर या जोडीने रावेरच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ओम मुंडेने ८५ धावांची (५६ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार) कर्णधारी खेळी केली, तर साहिलने ७७ धावांचे योगदान दिले. १८४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या रावेर रॉयल्सने शेवटपर्यंत झुंज दिली. यश नहार आणि तुषार चोरडिया यांनी चांगली सुरुवात करून दिली, मात्र चाळीसगावच्या अमेय कोळी आणि सरज पाटील यांनी मोक्याच्या क्षणी प्रत्येकी २ बळी घेत रावेरचा डाव १७५ धावांवर रोखला. या पराभवासोबतच रावेरचा स्पर्धेतील प्रवासही संपला. ८५ धावा आणि १ बळी घेणाऱ्या ओम मुंडेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
जळगाव कोगटा किंग्सचा एकतर्फी विजय
बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात जळगाव कोगटा किंग्सने जामनेर सातपुडा हिरोजवर मोठा विजय मिळवला. कोगटा किंग्सने प्रथम फलंदाजी करताना १९६ धावांचे विशाल लक्ष्य उभारले. सलामीवीर ओम भोसले (६४ धावा) आणि जितेंद्र नाईक (६४ धावा) यांनी १०२ धावांची शतकी भागीदारी करून जामनेरच्या गोलंदाजांना हतबल केले. जामनेरच्या ललित पाटीलने ३ बळी घेत किंग्सला २०० धावांच्या आत रोखले, मात्र हे आव्हान जामनेरच्या फलंदाजांना पेलवले नाही.
जामनेरचा डाव पत्त्यासारखा कोसळला
१९७ धावांचा पाठलाग करताना जामनेर सातपुडा हिरोजची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली. दोन्ही सलामीवीर शून्य धावांवर बाद झाल्यामुळे संघाची घसरगुंडी सुरू झाली ती शेवटपर्यंत थांबली नाही. जळगाव कोगटा किंग्सच्या सागर भावर याने ४ षटकांत केवळ १२ धावा देत ३ फलंदाजांना बाद केले. राज बेलदार आणि बिपिन चांगरे यांनीही प्रत्येकी २ बळी घेत जामनेरचा डाव अवघ्या ८५ धावांत गुंडाळला. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या ओम भोसलेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

याप्रसंगी अमित आहुजा, ज्ञानेश्वर पाटील, अभंग जैन, कुणाल शहा, विमल जैन, किरण बच्छाव, अतुल कोगटा यांसह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील वाढत्या चुरशीमुळे आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत कोण बाजी मारणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
