राज्यात IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली तर जळगावचे नवे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे
जळगाव (प्रतिनिधी) : राज्याच्या पोलीस यंत्रणेत मोठी उलथापालथ घडवत गृह विभागाने सोमवारी (२० एप्रिल) IPS अधिकाऱ्यांच्या व्यापक बदल्यांचे आदेश जारी केले. या निर्णयानुसार जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली थेट पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळे येथील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची धुरा सोपविण्यात आली आहे.
निवडणुकांनंतरची परिस्थिती आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या बदल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत ही प्रक्रिया पार पडली आहे.
राज्यात या ठिकाणी झाल्या बदल्या
या बदल्यांचा परिणाम राज्यातील अनेक जिल्ह्यांवर दिसून आला आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची सांगली येथे बदली झाली असून, पुण्याचे पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे यांच्यावर साताऱ्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) नियुक्त करण्यात आले आहे.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली असून, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांना पदोन्नती देत गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) पद देण्यात आले आहे. तसेच, पुण्याचे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिमच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रेड्डींची ठसा उमटवणारी कारकीर्द; धिवरेंकडून अपेक्षा वाढल्या
जळगावमध्ये कार्यरत असताना डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अवैध शस्त्रांवर कारवाई, गुन्हेगारी नियंत्रण आणि प्रशासनात शिस्त प्रस्थापित करण्यावर भर दिला होता. त्यांच्या बदलीनंतर आता श्रीकांत धिवरे यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी येत असून, त्यांच्या अनुभवाच्या जोरावर जळगावमध्ये गुन्हेगारीवर कसा अंकुश बसवला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
