JCL 2026: जळगाव कोगटा ‘किंग’चा रॉयल थाट; शतकवीर ओम भोसलेच्या वादळी फटकेबाजीने चाळीसगावचा धुव्वा!
चौकार षटकारांची अतिषबाजी; १७७ धावांचे लक्ष्य अवघ्या १६.४ षटकांत पूर्ण ; मेहुल इंगळे ठरला ‘मोस्ट डॉट बॉल’चा मानकरी
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग २०२६’ (JCL T-20) मध्ये आज खऱ्या अर्थाने धावांचा पाऊस पाहायला मिळाला. जळगाव कोगटा किंग विरुद्ध चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स यांच्यात झालेल्या लढतीत कोगटा किंगच्या ओम भोसले याने मैदानावर अक्षरशः वादळ निर्माण केले. ओमने ठोकलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर जळगाव कोगटा किंगने हा सामना एकतर्फी जिंकून स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.
चाळीसगावची दमदार सुरुवात, पण…
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सने निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १७६ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये लीगचा सर्वाधिक महागडा खेळाडू आणि कर्णधार ओम मुंडे याने आपल्या नावाचा दरारा दाखवत ४८ चेंडूत ८१ धावांची (५ चौकार, ४ षटकार) स्फोटक खेळी केली. त्याला साहिल गायकर याने ५८ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८१ धावांची मोलाची जोड दिली. दोघांच्या १७६ धावांच्या आव्हानामुळे चाळीसगावचा विजय सुकर वाटत होता.
ओम भोसलेचे ‘शतकी’ तांडव
१७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जळगाव कोगटा किंगची सुरुवात सावध असली तरी ओम भोसले याने सामन्याची सूत्रे हाती घेतली. ओमने चाळीसगावच्या गोलंदाजीची पिसे काढत अवघ्या ५८ चेंडूंत ९ चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांसह १०८ धावांची नाबाद खेळी केली. त्याला जितेंद्र नाईक याने ३३ चेंडूत ४१ धावा करून मोलाची साथ दिली. या जोडीने धावगती कायम राखत केवळ १६.४ षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. मनीष चव्हाणने ३ चौकार खेचून विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
मेहुल इंगळेच्या अचूक टप्प्याचा सन्मान
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या संकल्पनेतून यंदा ‘मोस्ट डॉट बॉल’ देण्यास सुरुवात झाली आहे. जळगाव कोगटा किंगच्या मेहुल इंगळे याने ४ षटकात केवळ २८ धावा देत २ बळी टिपले आणि सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकल्याबद्दल त्याला सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला नवरंग चहाचे अमर कुकरेजा, अलरिक इलेक्ट्रीकल्सचे सीईओ दीपक चौधरी, प्रविण कुंजवाला, अतुल कोगटा आणि विजय मराठे उपस्थित होते. सामन्याचे पंच म्हणून संदीप गांगुर्डे आणि संदीप चव्हाण यांनी जबाबदारी पार पाडली.
क्रीडा रसिकांची सोमवारी ‘ट्रिपल ट्रीट’ (२० एप्रिल):
उद्या जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर तीन महत्त्वाचे सामने रंगणार आहेत
सकाळी ८:३० वा. : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स विरुद्ध जामनेर सातपुडा हिरोज्.
दुपारी ३:०० वा. : जळगाव कोगटा किंग विरुद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज.
सायंकाळी ७:३० वा. : अमळनेर सुहास जायंट्स विरुद्ध रावेर रॉयल्स.
