पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचा बिगूल; ९ ते २९ एप्रिलदरम्यान मतदान
८२४ जागांसाठी १७.४ कोटी मतदार मतदान करणार; मतमोजणी ४ मे रोजी
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा निवडणुकांचे बिगूल वाजले असून आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. या निवडणुकांत एकूण ८२४ मतदारसंघांसाठी मतदान होणार असून सुमारे १७.४ कोटी मतदार २.१८ लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या उपस्थितीत दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या घोषणेनंतर संबंधित राज्यांमध्ये तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्यनिहाय मतदानाचा कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी येथे ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तामिळनाडू राज्यात २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. पश्चिम बंगालमध्ये यंदा दोन टप्प्यांत मतदान होणार असून पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल तर दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होईल. या सर्व राज्यांची मतमोजणी ४ मे रोजी करण्यात येणार आहे.
केरळ, आसाम व पुदुच्चेरीसाठी कार्यक्रम
या तीन राज्यांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांना २३ मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येतील. २४ मार्च रोजी अर्जांची छाननी होईल, तर २६ मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. ९ एप्रिल रोजी मतदान होऊन ४ मे रोजी मतमोजणी होईल.
तामिळनाडूतील निवडणूक प्रक्रिया
तामिळनाडूमध्ये ३० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून ३ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ७ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल आणि ९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील. २३ एप्रिल रोजी मतदान होऊन ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान
पश्चिम बंगालमध्ये यंदा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ३० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल आणि ६ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. ७ एप्रिल रोजी छाननी तर ९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. या टप्प्याचे मतदान २३ एप्रिल रोजी होईल. दुसऱ्या टप्प्यासाठी २ एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. ९ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येतील, १० एप्रिल रोजी छाननी होईल आणि १३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी पार पडेल.
महाराष्ट्रात बारामती व राहुरी येथे पोटनिवडणूक
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. या दोन्ही मतदारसंघांत २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
“या निवडणुकांमध्ये १७.४ कोटी मतदार सहभागी होणार असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे,” — ज्ञानेश कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त.
