कटक एससीबी मेडिकल कॉलेज आयसीयूमध्ये आग; १० रुग्णांचा मृत्यू
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष, मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले
कटक वृत्तसंस्था ओडिशाच्या कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये सोमवारी पहाटे २.३० ते ३ च्या दरम्यान आग लागल्याने किमान १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासातून असे लक्षात आले आहे की, आग आयसीयूच्या एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे दिसते.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, आयसीयूमध्ये एकूण २३ रुग्ण होते. यापैकी ७ रुग्णांचा आग लागलेल्या ठिकाणीच मृत्यू झाला, तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमी रुग्णांना तातडीने मेडिकल कॉलेजच्या इतर वॉर्डमधील आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ पोहोचून आग विझवण्यात यश मिळवले. तथापि, आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या अनेक रुग्णांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. एससीबी हॉस्पिटलचे अधिकारी अद्याप मृतांची नेमकी संख्या निश्चित करू शकलेले नाहीत.
मुख्यमंत्री मोहन चरण माझी घटनास्थळी पोहोचले आणि रुग्णालय प्रशासनासोबत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांसाठी तातडीने आवश्यक ती मदत करण्याचे आदेश दिले.
“आयसीयूतील रुग्णांची सुरक्षा हे प्राथमिक प्राधान्य असले पाहिजे; अशा अपघातांनी भविष्यात होऊ नयेत, यासाठी कठोर उपाययोजना होणे आवश्यक आहे,” – मोहन चरण माझी, मुख्यमंत्री, ओडिशा
