डी-मार्टसमोर कॅरीबॅग दुकानाला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
जळगाव : शहरातील डी-मार्टसमोर मनपा स्विमिंग पूल परिसरातील विनोबा नगर भागात असलेल्या वर्धमान कॅरीबॅग दुकानाला रविवारी (दि. ८ मार्च) सकाळी आग लागल्याची घटना घडली. स्थानिक नागरिक केशव कावडिया यांनी ही घटना लक्षात येताच तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिल्यामुळे त्वरित मदत पोहोचली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.

सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच महाबळ अग्निशमन केंद्र आणि गोलानी अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले.
आग विझवित असताना दुकानामध्ये अर्धा भरलेला भारत पेट्रोलियमचा गॅस सिलेंडर आढळून आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने हा सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढल्यामुळे मोठा स्फोट होण्याची शक्यता टळली.
या आगीत कॅरीबॅग तयार करण्यासाठी ठेवलेला कच्चा माल जळून नुकसान झाले आहे. संबंधित वर्धमान कॅरीबॅग दुकानाचे मालक तुषार मंत्री व विनय कोटेचा असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, आग विझविण्याच्या कामात अग्निशमन दलातील वाहन चालक देविदास सुरवाडे आणि प्रभाकर पाटील यांच्यासह मनोज तिरवड, वृषभ सुरवाडे, भूषण पाटील, गोपाल (वॉचमन), भावेश मराठे आणि सौरभ चिकटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे परिसरातील इतर दुकाने आणि मालमत्ता सुरक्षित राहिली.
