एलपीजी गॅस फक्त घरगुती वापरासाठी; हॉटेल-उद्योगांना मोठा फटका
घरगुती सिलिंडर ६० रुपयांनी महाग
नागपूर : प्रतिनिधी युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी गॅसचा पुरवठा केवळ घरगुती वापरासाठीच करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना एलपीजी गॅसचा पुरवठा बंद करण्यात येणार असून हा पुरवठा केवळ सरकारी कंपन्यांमार्फतच केला जाईल, असा आदेश Ministry of Petroleum and Natural Gas यांनी जारी केला आहे. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट व उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घरगुती सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याची तक्रार आहे. काही गॅस एजन्सीकडून ग्राहकांना पुढील महिनाभर सिलिंडर मिळणार नसल्याचे सांगितले जात असून त्यामुळे गॅसचा काळाबाजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला असून १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार दिल्लीमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपये झाली आहे. वाढीव दर ७ मार्चपासून लागू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सीएनजीच्या बाबतीत परिस्थिती तुलनेने काहीशी स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. ज्या ठिकाणी सीएनजी उपलब्ध आहे, तेथे उद्योगांनी एलपीजीऐवजी सीएनजीचा वापर सुरू केला आहे. मात्र देशातील अनेक भागांत सीएनजी नेटवर्क उपलब्ध नसल्याने त्या भागातील हॉटेल व उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
