अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांच्या खुनाचा कट उघड
मेहुणबारे पोलिसांची कारवाई; चार आरोपी अटकेत, पिकअप वाहन जप्त
मेहुणबारे : प्रतिनिधी – चाळीसगाव तालुक्यातील दस्केबडी गावातील सरपंच व उपसरपंच यांना अपघाताचा बनाव करून जीवे ठार मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून मेहुणबारे पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मेहुणबारे पोलीस ठाण्यात दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी ईश्वर ऊर्फ भैय्या लक्ष्मण अहिरे (उपसरपंच, रा. दस्केबडी ता. चाळीसगाव) यांच्या तक्रारीवरून सुरुवातीला रोड अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासादरम्यान हा अपघात नसून नियोजनबद्ध कट असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी रात्री उपसरपंच ईश्वर अहिरे आणि सरपंच भगवान उत्तम देवरे हे बुलेट मोटारसायकलने चाळीसगाव येथून दस्केबडीकडे जात असताना शिदवाडी शिवारातील मेहुणबारे-शिदवाडी मार्गावर समोरून आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे खाली पडले असून सरपंच भगवान देवरे हे गंभीर जखमी झाले होते.
या घटनेनंतर फिर्यादी अहिरे यांनी हा साधा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे पिकअप वाहनाचा शोध घेत त्याचा मालक ताब्यात घेतला. चौकशीदरम्यान गावातील राजकीय वैमनस्यातून आरोपींनी कट रचून अपघाताचा बनाव करून सरपंच व उपसरपंच यांना पिकअप वाहनाने धडक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.
या प्रकरणात भिमराव पांडुरंग रोकडे, सचिन भिमराव रोकडे, गोविंदा विठोबा माळी आणि लक्ष्मण अशोक महाजन (रा. बाडे, ता. भडगाव) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अपघातात वापरण्यात आलेले पिकअप वाहन पोलिसांनी जप्त केले असून सुरुवातीला दाखल करण्यात आलेल्या अपघाताच्या कलमांऐवजी आता आरोपींवर फौजदारी कट रचून खुनाचा प्रयत्न केल्याचे गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.
ही कारवाई प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोहेकॉ किशोर पाटील, शांताराम पवार, सचिन निकम, योगेश पाटील, विनोद बेलदार, संजय लाटे आदी पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व पोलीस कर्मचारी संजय लाटे करत आहेत.
