जळगाव महापालिकेच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे; उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची निवड
महायुतीची बिनविरोध सत्ता; १७ मजली इमारतीत भगवेमय वातावरण, कार्यकर्त्यांचा जल्लोष
जळगाव प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया आज, शुक्रवारी (६ फेब्रुवारी) उत्साहात पार पडली. अपेक्षेप्रमाणे, महायुतीच्या दीपमाला काळे यांची १७ व्या महापौरपदी, तर मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत या निवडींवर शिक्कामोर्तब झाले. याप्रसंगी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसचिव गोविंद शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
बिनविरोध निवडीने सत्ता काबीज
महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर संख्याबळानुसार महापौरपद भाजपकडे आणि उपमहापौरपद शिवसेनेकडे जाणार हे निश्चित होते. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली. निवडीची घोषणा होताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने महापौर व उपमहापौरांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
भगव्या फेट्यांनी सभागृह दुमदुमले
या विशेष सभेचे मुख्य आकर्षण म्हणजे महायुतीचे सर्व नगरसेवक भगवे फेटे परिधान करून उपस्थित होते. यामुळे संपूर्ण १७ मजली इमारत आणि सभागृह भगवेमय झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या सभेत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडीची बातमी समजताच महापालिका आवारात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला. “जळगाव शहराच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे आणि विकासाचा गाडा नव्या जोमाने पुढे नेणे हीच आमची प्राथमिकता असेल,” असा विश्वास नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी यावेळी व्यक्त केला.
