ऐतिहासिक क्षण! सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; राजभवनावर पार पडला शपथविधी
‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमले सभागृह; नियोजन व वित्त खाते वगळता तीन खात्यांची जबाबदारी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एका सुवर्ण अध्यायाची नोंद झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी आज सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २८ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या या पदावर सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, राजभवनावर अत्यंत साध्या वातावरणात हा सोहळा पार पडला.
राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती देण्यात आली आहेत. तर अजित पवारांचे नियोजन आणि वित्त हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे.

‘दादां’च्या स्मृतींना उजाळा; घोषणांनी परिसर दुमदुमला
शपथविधी सोहळ्यादरम्यान सभागृहात भावनिक वातावरण पाहायला मिळाले. उपस्थित समर्थकांनी आणि नेत्यांनी ‘अजित पवार अमर रहे’, ‘एकच वादा, अजित दादा’ अशा घोषणा देत आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृतींना उजाळा दिला. अजित पवारांच्या निधनानंतरची राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार आता राज्याची धुरा सांभाळणार आहेत.
आज दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष आणि विधानपरिषद सदस्यांची बैठक झाली. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, जो एकमताने मंजूर झाला.
राजीनामा: उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारपदाचा अधिकृत राजीनामा दिला.
सायंकाळी ५ वाजता राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित
या ऐतिहासिक सोहळ्याला महायुतीतील दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, तसेच चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आणि इतर अनेक आमदारांचा समावेश होता.
आता लक्ष खातेवाटपाकडे
शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे. आता थोड्याच वेळात राज्यपाल सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती महत्त्वाची खाती सोपवली जाणार, याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. अजित पवारांकडे असलेले वित्त आणि नियोजन मंत्रालय सुनेत्रा पवारांकडेच राहणार की काही बदल होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.
सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास
जन्म 18 ऑक्टोबर 1963 कुटुंब त्यांचे वडील बाजीराव पाटील आणि भाऊ पद्मसिंह पाटील हे दोघेही राजकारणात होते.शिक्षण : 1983 मध्ये वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली.लग्न : 1985 मध्ये अजित पवार यांच्यासोबत लग्न. 2 मुले, पार्थ आणि जय.
सामाजिक कार्य: NGO एन्व्हायर्नमेंटल फोरम इंडियाची स्थापना केली. त्यांनी बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा म्हणून काम केले, जे हजारो महिलांना रोजगार देते. त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या म्हणून काम केले.
राजकारणात प्रवेशः 2024 ची लोकसभा निवडणूक बारामती येथून लढवली. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव. 18 जून 2024 रोजी राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या. आता उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.
