Thursday, February 5, 2026
HomeBlogअलविदा "दादा' ; अजित पवार यांना आज अखेरचा निरोप

अलविदा “दादा’ ; अजित पवार यांना आज अखेरचा निरोप

अलविदा “दादा’ ; अजित पवार यांना आज अखेरचा निरोप

​राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

​बारामती/पुणे प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे काल २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या भीषण अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असून, आज सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


​जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी अजित पवार काल मुंबईहून बारामतीकडे विमानाने रवाना झाले होते. बारामतीमध्ये त्यांच्या आज चार सभा नियोजित होत्या. मात्र, विमानतळावर लँडिंग होत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमानाने पेट घेतला आणि त्यात अजित पवारांचा मृत्यू झाला. या वृत्ताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

अंतिम दर्शनाचे नियोजन
​अपघातानंतर अजित पवारांचे पार्थिव बारामती मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले होते. आज पार्थिव काठेवाडी आणि नंतर विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती..

आज अंत्ययात्रा
​आज २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अजित पवारांची अंत्ययात्रा निघेल. गदिमा चौक, विद्यानगरी चौक आणि विद्याप्रतिष्ठानच्या अंतर्गत रस्त्यावरून ही यात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचेल. सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,यांच्यासह कार्यकर्ते नागरिक उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

तीन दिवसांचा शासकीय दुखवटा
​राज्य सरकारने २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात राज्यातील सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार असून, कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम होणार नाहीत. तसेच, आज २८ जानेवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील नेत्यांच्या भावूक प्रतिक्रिया:

“काम करणारा माणूस” ही प्रतिमा कुणी दिलेली नव्हे, ती दादांनी त्यांच्या कृतीतून स्वतः निर्माण केली होती. राजकारणापलीकडे संबंध जपणारा, स्पष्टवक्तेपणा, बोलण्यातली मिश्कीली आणि राजकारणातील अस्सल “नमुना” आज आपण गमावला आहे.
काल कॅबिनेटमध्ये आमच्यासोबत असलेले दादा आज आपल्यात नाहीत…यापुढे ते समोर दिसणार नाहीत, बोलणार नाहीत, खांद्याला खांदा लावून उभे राहणार नाहीत…
हे वास्तव स्वीकारायला मन तयार होत नाही.
“कामाचा माणूस” म्हणून महाराष्ट्रभर ओळख असणारे अजितदादा आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या कार्यातून, निर्णयांतून आणि असंख्य आठवणींतून ते सदैव आपल्या मनात चिरायू राहतील.
भावपूर्ण श्रद्धांजली!
 गिरीश महाजन.
मंत्री जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभाग महाराष्ट्र राज्य.
  • गुलाबराव पाटील (पालकमंत्री): “अजितदादांचे निधन ही मन हेलावून टाकणारी घटना आहे. महाराष्ट्राने एक कणखर आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.”
  • एकनाथराव खडसे (आमदार तथा माजी मंत्री): अत्यंत भावूक होत खडसे म्हणाले, “अजितदादा हे केवळ नेते नव्हते, तर दिलेल्या शब्दाला प्रामाणिक राहणारे ते एकमेव व्यक्तिमत्व होते. राजकारणात दादांसारखा स्पष्टवक्ता आणि शब्दाचा पक्का माणूस पुन्हा होणे नाही.”
  • राजूमामा भोळे (आमदार, जळगाव शहर): “दादांची कामातील शिस्त, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरील पकड हीच त्यांची खरी ओळख होती. त्यांचा साधेपणा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील.”
  • डॉ. उल्हास पाटील: “दादांसारखे स्पष्टवक्ते, कणखर आणि कामावर विश्वास ठेवणारे नेतृत्व पुन्हा होणे नाही. हे वृत्त मनाला चटका लावणारे आहे.”
  • डॉ. केतकी पाटील (भाजप जिल्हा सरचिटणीस): “कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा आणि राज्याच्या भविष्यासाठी कठोर निर्णय घेणारा एक मोठा आधारस्तंभ आज कोसळला आहे.”

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राजकीय कारकीर्द

अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. बी.कॉम. शिक्षण घेतलेल्या अजित पवार यांनी शेती व्यवसाय सांभाळत राजकारणात प्रवेश केला. ते लोकसभा सदस्य, सात वेळा विधानसभा सदस्य, विविध खात्यांचे मंत्री आणि अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिले. वित्त, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी प्रभावीपणे हाताळली. त्यांच्या कार्यकाळात पाणी व्यवस्थापन, ऊर्जा प्रकल्प आणि आर्थिक नियोजन यांना विशेष महत्त्व देण्यात आले.

सहकार, शेती आणि ग्रामीण प्रश्नांमधून राजकारणात सक्रिय सहभाग

बारामती परिसरात संघटनात्मक कामातून नेतृत्वाची ओळख

लवकरच राज्य पातळीवरील प्रभावी नेता म्हणून उदय

संसदीय व विधानसभा कारकीर्द

लोकसभा सदस्य: जून १९९१ ते सप्टेंबर १९९१

महाराष्ट्र विधानसभा सदस्य (एकूण सात वेळा):

१९९१ – १९९५

१९९५ – १९९९

१९९९ – २००४

२००४ – २००९

२००९ – सप्टेंबर २०१४

२०१४ – २६ सप्टेंबर २०१९

२०१९ – २०२४

दीर्घकाळ बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व

जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण आणि कामाची गती यासाठी ओळख

राज्यमंत्री म्हणून कारकीर्द

कृषी व ऊर्जा राज्यमंत्री: जून १९९१ – नोव्हेंबर १९९२

पाणीपुरवठा, ऊर्जा व नियोजन राज्यमंत्री: नोव्हेंबर १९९२ – फेब्रुवारी १९९३

या काळात ग्रामीण विकास व पायाभूत सुविधांवर भर

कॅबिनेट मंत्री म्हणून महत्त्वाची खाती

पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण), फलोत्पादन मंत्री: ऑक्टोबर १९९९ – जुलै २००४

ग्रामीण विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री: जुलै २००४ – नोव्हेंबर २००४

जलसंपदा व स्वच्छता मंत्री: नोव्हेंबर २००४ – नोव्हेंबर २००९

जलसंपदा व ऊर्जा मंत्री: नोव्हेंबर २००९ – नोव्हेंबर २०१०

राज्यातील धरणे, कालवे, सिंचन प्रकल्प, पाणी व्यवस्थापनात सक्रिय भूमिका

उपमुख्यमंत्री म्हणून दीर्घ अनुभव

उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन व ऊर्जा):

नोव्हेंबर २०१० – सप्टेंबर २०१२

डिसेंबर २०१२ – सप्टेंबर २०१४

उपमुख्यमंत्री (संक्षिप्त कार्यकाळ):

२३ नोव्हेंबर २०१९ – २६ नोव्हेंबर २०१९

उपमुख्यमंत्री:

३० डिसेंबर २०१९ – २९ जून २०२२

विरोधी पक्षनेते:

४ जुलै २०२२ – ३० जून २०२३

उपमुख्यमंत्री (पुन्हा):

२ जुलै २०२३ – २६ जानेवारी २०२४

उपमुख्यमंत्री:

डिसेंबर २०२४ – २८ जानेवारी २०२६

६. संस्थात्मक व सामाजिक भूमिका

बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे – सदस्य

रयत शिक्षण संस्था, सातारा – संचालक

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ – अध्यक्ष (सप्टेंबर २००६ पासून)

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – मार्च २०१३ पासून

महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – अध्यक्ष (ऑगस्ट २००६ – ऑगस्ट २०१८)

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – अध्यक्ष (सप्टेंबर २००५ – मार्च २०१३ व नोव्हेंबर २०१८ पासून)

महानंद व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ – संचालक

ताज्या बातम्या