Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमजळगावात मध्यरात्री घराला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला!

जळगावात मध्यरात्री घराला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला!

जळगावात मध्यरात्री घराला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला!

​कोल्हे हिल्स परिसरातील देवरामनगरमधील घटना; सुदैवाने जीवितहानी टळली

​जळगाव | प्रतिनिधी शहरातील कोल्हे हिल्स रोडवरील देवरामनगर परिसरात आज बुधवार २१ रोजी मध्यरात्री एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

​याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देवरामनगर येथील रहिवासी जितेंद्र गणपत लोखंडे यांच्या घराला मध्यरात्री २१ जानेवारी रोजी१२.४५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. तालुका पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल मिलिंद सपकाळे यांनी तत्काळ या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.
​ घटनेचे गांभीर्य ओळखून महापालिकेचा एक अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करून आग काही वेळातच पूर्णपणे विझवली. जर आग वेळीच आटोक्यात आली नसती, तर ती शेजारील घरांमध्ये पसरण्याची दाट शक्यता होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहन चालक देविदास सुरवाडे यांच्यासह कर्मचारी रोहिदास चौधरी, योगेश पाटील, ऋषभ सुरवाडे, विठ्ठल पाटील आणि शुभम सोनवणे यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

​या आगीत लोखंडे यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ताज्या बातम्या