Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमकर्नाटकात ‘ईव्हीएम’ नव्हे तर मतपत्रिकांद्वारेच निवडणुका !

कर्नाटकात ‘ईव्हीएम’ नव्हे तर मतपत्रिकांद्वारेच निवडणुका !

कर्नाटकात ‘ईव्हीएम’ नव्हे तर मतपत्रिकांद्वारेच निवडणुका !

बंगळुरू महापालिकेसह जिल्हा व पंचायत समिती निवडणुकांत मतपत्रिकांचा वापर

बंगळुरू   वृत्तसस्था: ‘ईव्हीएम’च्या विश्वासार्हतेवर सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आगामी बंगळुरू महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारेच घेण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा केली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने गेल्या सप्टेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर सर्व संबंधित घटकांशी सविस्तर सल्लामसलत करून हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संगरेशी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बृहत बंगळुरू महानगर प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या पाच नगर परिषदांच्या निवडणुका २५ मेनंतर मतपत्रिकांद्वारे घेतल्या जातील, असे संगरेशी यांनी सांगितले. याचबरोबर जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणुकांमध्येही कागदी मतपत्रिकांचाच वापर करण्यात येणार आहे.

या निर्णयावर स्पष्टीकरण देताना आयुक्त संगरेशी म्हणाले की, हा निर्णय कोणत्याही सरकारी दबावाखाली घेण्यात आलेला नाही. राज्य निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून, निवडणूक प्रक्रियेबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आयोगालाच आहेत.

कर्नाटकातील या निर्णयामुळे देशभरात ईव्हीएम विरुद्ध मतपत्रिका या विषयावर सुरू असलेल्या चर्चेला नव्याने बळ मिळाले असून, आगामी काळात इतर राज्येही अशाच प्रकारचा विचार करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या