प्रभाग क्रमांक ६ मध्ये धीरज सोनवणे यांचा श्रीफळ वाढवून दमदार शुभारंभ
जळगाव (प्रतिनिधी) : महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार व माजी नगरसेवक धीरज मुरलीधर सोनवणे यांनी आज आपल्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ केला. गणेश नगर येथील हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीने संपूर्ण भाग गजबजून गेला होता.
प्रचाराच्या पहिल्याच दिवशी धीरज सोनवणे यांनी भक्कम शक्तीप्रदर्शन करत विरोधकांना स्पष्ट संदेश दिला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते किशोर देशमुख यांच्यासह पॅनलमधील सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. “एकच ध्यास, प्रभागाचा विकास” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या रॅलीत महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आल्याने सुरुवातीलाच सोनवणे यांच्या उमेदवारीला मोठे जनबळ लाभल्याचे चित्र स्पष्ट झाले.
यानंतर धीरज सोनवणे यांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला. गेल्या कार्यकाळात प्रभागात राबवलेल्या विकासकामांचा आढावा घेत भविष्यातील नियोजन त्यांनी नागरिकांसमोर मांडले. रस्त्यांची कामे, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज लाईन आणि पथदिवे या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
गणेश नगर, हनुमान नगर आणि आसपासच्या परिसरात नागरिकांनी औक्षण व स्वागत करत धीरज सोनवणे यांना पाठिंबा दर्शविला. “हक्काचा माणूस आणि कामाचा अनुभव” या विश्वासावर प्रभागातून धीरज सोनवणे व त्यांच्या पॅनलला मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
विशेष बाब म्हणजे या प्रचार रॅलीत युवाशक्तीचा सहभाग लक्षणीय होता. सोशल मीडियासह प्रत्यक्ष जनसंपर्कातून तरुणांपर्यंत पोहोचण्यात धीरज सोनवणे यांना यश मिळत असल्याचे यावेळी दिसून आले. तसेच महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनीही एकजूट दाखवत रॅलीत सहभाग नोंदवला.
प्रचाराच्या पहिल्याच दिवशी दाखवलेल्या या ताकदीमुळे प्रभाग ६ मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत असून, पुढील काही दिवसांत प्रचाराची धग आणखी वाढण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
