अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा महापूर; आकडा हजार पार
एकाच दिवशी ७६३ अर्ज दाखल; १९ प्रभागांत निवडणूक चुरस टोकाला
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरू असलेल्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेने अखेरच्या दिवशी अक्षरशः कळस गाठला. मंगळवारी (ता. ३०) अवघ्या एका दिवसात तब्बल ७६३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केल्याने एकूण अर्जांची संख्या १,०३८ वर जाऊन ठेपली. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रत्येक प्रभागात बहुरंगी आणि अटीतटीच्या लढती रंगण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत.
महापालिकेतील सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पहाटेपासूनच उमेदवार, समर्थक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. दुसऱ्या मजल्यापासून अकराव्या मजल्यापर्यंत संपूर्ण इमारत अर्जदारांच्या गजबजाटाने भरून गेली होती. अर्ज स्वीकारणे, तपासणी करणे आणि त्रुटी दुरुस्त करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहिली. शेवटच्या दिवशी १५६ अर्जांची विक्री झाली असून, काही उमेदवारांच्या अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याने त्यांनी पुन्हा अर्ज खरेदी करून नव्याने अर्ज भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे दिवसभर महापालिका परिसरात प्रचंड धावपळ सुरू होती.
या प्रक्रियेदरम्यान मंगळवारी अनेक मातब्बर इच्छुकांनीही अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले. शेवटच्या तासांमध्ये इच्छुकांची संख्या अचानक वाढल्याने अर्ज कक्षांबाहेर रांगा, गोंधळ आणि गर्दीचे दृश्य दिसून आले.
निवडणूक प्रक्रियेची सुरुवात २३ डिसेंबरपासून अर्ज विक्री आणि अर्ज दाखल करण्याने झाली होती. अवघ्या सहा दिवसांत १९ प्रभागांमधून तब्बल २,४९७ अर्जांची विक्री झाली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्वाधिक १५३ अर्जांची विक्री झाल्याने या प्रभागात निवडणूक अधिकच रंगतदार आणि चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळपासूनच उमेदवारांची वर्दळ, अर्ज तपासणीसाठी लागलेल्या रांगा, कार्यकर्त्यांची घाईगडबड आणि अंतिम क्षणांतील धावपळ यामुळे महापालिका निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापलेले होते. अनेक इच्छुकांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहून अर्ज दाखल केल्याने मंगळवारी अक्षरशः अर्जांचा पाऊस पडल्याचे चित्र होते.
दिनांकनिहाय पाहता २६ डिसेंबर रोजी केवळ १ अर्ज, २७ डिसेंबरला २४ अर्ज, २९ डिसेंबरला २५० अर्ज, तर ३० डिसेंबर रोजी विक्रमी ७६३ अर्ज दाखल झाले. अशा प्रकारे एकूण १,०३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (ता. ३१) सकाळी अकरापासून महापालिका भवनात होणार आहे. छाननीनंतर प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात किती उमेदवार उरतात, हे स्पष्ट होणार असून त्यानंतरच निवडणुकीच्या खरी गणिते आणि राजकीय चित्र उलगडणार आहे.
