Thursday, May 7, 2026
HomeBlogकुख्यात ‘लेडी स्नॅचर’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात

कुख्यात ‘लेडी स्नॅचर’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात

कुख्यात ‘लेडी स्नॅचर’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात

बरेलीतून शनिपेठ पोलिसांनी केली अटक

जळगाव प्रतिनिधी

शहरातील आर.सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु.ना. गाडगीळ या नामांकित सुवर्णपेढ्यांमधून तब्बल ४.७० लाख रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने लंपास करणारी लकी शिवशक्ती शर्मा (३८, रा. बरेली, उत्तरप्रदेश) ही कुख्यात ‘लेडी स्नॅचर’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. युट्यूब, क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया यांसारख्या व्हिडीओंमधून चोरीची पद्धत शिकत ती गेली दहा वर्षे विविध राज्यांमध्ये दुकानांना लक्ष्य देत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

ऑक्टोबर महिन्यात जळगावातील सुवर्णपेढ्यांमध्ये एकामागून एक झालेल्या चोरीच्या घटनांनंतर जिल्हापेठ व शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले. सीसीटीव्हीत महिलेचा स्पष्ट दिसणारा चेहरा पोलिसांसाठी महत्त्वाचा धागादोरा ठरला. तांत्रिक तपासातून ती महिला उत्तरप्रदेशातील बरेली येथील असल्याचे समोर आले. निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी प्रदीप नन्नवरे, वैशाली पावरा आणि निलेश घुगे यांच्या पथकाने बरेली येथे धाड टाकून संशयित महिलेला अटक केली.

गुगल मॅपवर सोन्याचे शोरूम शोधून चोरीची आखणी

युट्यूबवरून चोरीच्या पद्धती शिकल्याप्रमाणेच, सोन्याच्या दालनांची लोकेशन शोधण्यासाठी ती गुगल मॅपचा वापर करीत असे. कोणत्या शहरात कोणते नवे शोरूम आहे, ग्राहकांची गर्दी कधी कमी असते, कोणत्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था कमकुवत आहे याचा अभ्यास करून ती दुकानात प्रवेश करीत असे.

दुकानात गेल्यानंतर अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने ती खऱ्या अंगठीऐवजी बनावट अंगठी देऊन मूळ सोन्याची अंगठी गुपचूप खिशात सरकवत असे. यासाठी तिने वेगवेगळ्या ठिकाणच्या शोरूममधून टाकण्यात आलेले कचऱ्यातील क्यूआर टॅग, दागिन्यांचे लेबले चोरून ठेवली होती. ते टॅग बनावट अंगठ्यांना लावून ती चोरी अधिक कौशल्यपूर्णपणे करीत असल्याचे तिच्या कबुलीजबाबातून समोर आले.

नागपुरातही चोरी; मालकांच्या दक्षतेने गुन्हा टळला

जळगावातील चोरीनंतर ती नागपूरमध्ये गेली आणि खंडेलवाल ज्वेलर्स व लोंदे ज्वेलर्सला लक्ष्य केले. मात्र जळगाव सराफ असोसिएशनने राज्यभरात पाठविलेल्या फोटोमुळे नागपूरमधील सराफ सावध झाले. संशय आल्याने तिला थेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. येथे तिने चोरलेल्या अंगठ्या काढून दिल्याने स्वतंत्र गुन्हा नोंदवला गेला नाही.

तीन राज्यांमध्ये गुन्ह्यांची मालिका

लकी शर्मा हिने यापूर्वी हरियाणातील कर्णाल, हिमाचल प्रदेश, छत्रपती संभाजीनगर व जळगाव येथील सुवर्णपेढ्यांमध्येही अशाच पद्धतीने चोरी केल्याचे उघड आहे. सध्या तिची सखोल चौकशी सुरू असून आणखी अनेक गुन्ह्यांचा तपशील समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

ही सीसीटीव्हीच्या धाग्यावरून उकललेली कारवाई शहरातील सुवर्णव्यवसायिकांसाठी मोठा दिलासा ठरली असून पोलिसांनी गुन्हेगारी पद्धतींचा अभ्यास करून सतत नवी तांत्रिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या