अट्टल गुन्हेगार साहिल पठाण सुरतमधून पळाला ; जळगावच्या एलसीबीने भुसावळात सापळा रचून पकडला !
जळगाव | प्रतिनिधी: गुजरात राज्यातील सुरत येथून पळालेल्या अटल गुन्हेगाराला जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथे सापळा रचून अटक केली असून त्याला पुढील कारवाईसाठी सुरत पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आहे.
साहील उर्फ सलीम पठान (वय २१, रा. भाटीया गाव, हाजीपुरा, सचिन, जि. सुरत) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर तापी व्यारा येथील सेशन कोर्टातील जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यात तो फरार होता. साहिल याला आज १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११:१५ वाजता नहाटा चौफुलीजवळील हायवेवर पकडण्यात आले.
गुजरात पोलिसांच्या माहितीवर सापळा
निझर पोलीस स्टेशन, सुरत येथून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. पथकाने अचूक नियोजन करत साहील पठानला सापळा रचून ताब्यात घेतले. या आरोपीवर जबरी चोरी, घरफोडी, चोरी आणि आर्म अॅक्टसह तब्बल आठ गंभीर गुन्हे उमरा, सचिन, माहीरापुरा, पुना, कडोदरा आणि नवसारी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत.
वैद्यकीय तपासणीनंतर गुजरात पोलिसांच्या ताब्यात
साहील पठान याला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी निझर पोलीस स्टेशन (गुजरात) येथील सफौ/ए. बी. पटेल यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनिरिक्षक शरद बागल, रवि नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पोना विकास सातदिवे, पोकॉ प्रशांत परदेशी आणि राहुल वानखेडे यांनी या धडाकेबाज कारवाईत मोलाची भूमिका बजावली. जळगाव पोलिसांच्या या सतर्क कारवाईमुळे गुन्हेगारीविरुद्ध कठोर कारवाईचा संदेश पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.
कामयानी रेल्वे लुटीप्रकरणीही मोठी कारवाई
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने कामयानी रेल्वे लुटीप्रकरणी ४ लाख ५० हजार रुपये रोख रकमेसह चार दरोडेखोरांना अटक केली आहे. या यशस्वी कारवाईमुळे जळगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.