मुक्ताईनगरमध्ये तब्बल १ कोटींचा गुटखा जप्त; दोन जणांना अटक
एलसीबीची धडाकेबाज कारवाई
जळगाव : महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मुक्ताईनगर येथे मोठी कारवाई केली. पोलिसांनी तब्बल ₹१ कोटी २ लाख ३३ हजार ४६० किमतीचा गुटखा आणि वाहन जप्त करून दोन आरोपींना अटक केली.
३ सप्टेंबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळताच उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पथकाने सारोळा फाट्यावर नाकाबंदी करून वाहन पकडले. झडतीत मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला.
या प्रकरणी मध्यप्रदेशातील आशिष राजकुमार जयस्वाल व नागपूरचा आशिफ खान बुल्ला खान या दोघांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह सलीम तडवी, छगन तायडे, रतन गिते, मयुर निकम व भरत पाटील यांनी सहभाग घेतला.