फरकांडे येथील झूलता मनोरा… एक अद्भुत स्थापत्य अभियांत्रिकी!
जगाला अशा अद्भुत गोष्टींचे आकर्षण असते. म्हणून लोक फ्रान्समधील आयफेल टॉवर किंवा इटलीतील पिसाचा कलता मनोरा पाहण्यासाठी जातात. ही स्थापत्य अभियांत्रिकीतील विलक्षण कलाकृती आहेत. अशीच एक अद्भुत स्थापत्य रचना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील फरकांडे गावात आहे. सध्या त्याला पूर्वीचे वैभव परत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य पुरातत्त्व विभागाला निधी दिला असून, पुरातत्त्वशास्त्रीय दृष्टिकोनातून येथे काम सुरू आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन घेतलेला हा वेध…!
जळगाव शहरापासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर कासोदा–फरकांडे हे गाव आहे. आज हे गाव आडमार्गी वाटत असले तरी जुन्या काळी हे हमरस्त्यावरील बाजारपेठेचे गाव होते. त्याचे अवशेष आणि खाणाखुणा आजही गावात दिसून येतात. जळगाव–धुळे मार्गावरील एरंडोलच्या दक्षिणेकडे १६ किलोमीटरवर आणि प्रसिद्ध पद्मालय देवस्थानापासून २४ किलोमीटरवर हे गाव वसले आहे. गावाच्या जवळून प्राचीन ओळख असलेली अंजनी नदी वाहते. गावातून वाहणारा एक ओढा पुढे अंजनीला जाऊन मिळतो.
या गावाचे प्राचीन महत्त्व समजून घेताना एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग दृष्टीपथात येतो – प्राचीन ‘त्रिराष्ट्रीय मार्ग’. हा मार्ग त्र्यंबकेश्वर (नाशिक) – प्राचीन उज्जैन – पाटलिपुत्र (आजचे बिहारमधील पाटणा) असा होता. नंदुरबार – चाळीसगाव – एरंडोल – फरकांडे – यावल मार्गे ही व्यापारी व धार्मिक यात्रा होत असे. उज्जैनकडे जाणाऱ्या वटवृक्षासारख्या मार्गशाखांपैकी एक शाखा फरकांडे मार्गे गेली असावी. यावरून या गावाचे प्राचीन महत्त्व अधोरेखित होते.
मध्ययुगीन राजकीय स्थान
१७व्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांचे साम्राज्य मध्य भारत व उत्तर भारतात विस्तारले होते. खानदेश भागावर नेवाळकर घराण्याची जहागिरी होती. पारोळा येथील भूईकोट किल्ला हे त्याचे केंद्र होते. त्या किल्ल्यापासून फरकांडे फक्त १६ किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी येथे घोड्याचा व त्यापूर्वीच्या काळात हत्तींचा बाजार भरत होता, असे पुसटसे उल्लेख आढळतात. यावरून या गावाला तत्कालीन राजकीय आणि व्यापारी महत्त्व होते, हे स्पष्ट होते. गावात जुन्या गढ्यांचे अवशेष आजही पाहायला मिळतात.
झूलता मनोरा आणि फरकांडे
मधल्या काळात विस्मृतीत गेलेला झूलता मनोरा ब्रिटिश कालखंडात पुन्हा प्रकाशझोतात आला. सध्याचे बांधकाम पाहता, या मनोऱ्यांचे बांधकाम ३-४ शतकांपूर्वीचे असावे असे वाटते. पण आसपासचा परिसर, घाट, विहिरीची रचना पाहता इथे यापूर्वी काही तरी वेगळे स्थापत्य असावे, असे वाटते. दुर्दैवाने याविषयी कुठलीही लेखी नोंद उपलब्ध नाही, त्यामुळे निश्चित भाष्य करणे कठीण आहे. मात्र, या परिसरात पुरेसा अभ्यास करण्याची गरज नक्कीच आहे.
मुख्य आकर्षण अर्थातच झूलता मनोरा. खरंतर येथे दोन झूलते मनोरे होते. १९९१ मध्ये एक मनोरा कोसळल्याने सध्या एकच शिल्लक आहे. मी स्वतः त्या मनोऱ्यात चढून वरपर्यंत जाऊन त्या हलत्या मनोऱ्याचा थरार अनुभवला आहे. याआधी मी रेणापूर (लातूर) येथील रेणुकादेवी मंदिराजवळील हलती दीपमाळ पाहिली होती, जी हलवता येते पण चढता येत नाही. फरकांड्याच्या मनोऱ्यावर मात्र १५ मीटर उंचीपर्यंत अरुंद, सर्पाकार पायऱ्यांनी चढून गेलो. उंच शेलाट्या ताड झाडासारखा वाऱ्याच्या वेगाने हलणारा हा मनोरा हालवला की खरंच रोमांचक अनुभव देणारा होता. हृदय कमकुवत असलेल्यांनी वर चढण्याचे धाडस करू नये, असा अनुभवांतून मिळालेला माझा सल्ला आहे!
हे ठिकाण आता पुन्हा पर्यटनाच्या नकाशावर येत आहे. पाटणादेवी, पद्मालय आणि फरकांडेचे झूलते मनोरे असे एकत्रित पर्यटन सर्किट तयार होऊ शकते. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार १९६० पर्यंत येथे परदेशी पर्यटकही भेट देत असत. जिल्हा प्रशासन व पुरातत्त्व विभाग यांच्या प्रयत्नांतून हे वैभव पुन्हा प्राप्त होण्याची चिन्हे आहेत.
प्रारंभी मनोऱ्याभोवतीची माती काढून दगडी फरशी टाकण्यात आली. मनोऱ्याचे तिन्ही घुमट, छप्पर आणि भिंतींची डागडुजी झाली आहे. अजून काही कामे बाकी असली तरी गावकऱ्यांचा सहभाग आणि प्रशासनाचा दृष्टीकोन पाहता ही वास्तू नव्या रूपात पर्यटकांसमोर उभी राहील, असा विश्वास वाटतो.
झूलत्या मनोऱ्याचे स्थापत्य अभियांत्रिकी
जगात असे झूलते मनोरे काही ठिकाणी आहेत. त्यांच्या स्थापत्य अभियांत्रिकीची रचना सामान्य वास्तुकलेपलीकडे जाणारी आहे. अशा मनोऱ्यांत Coupled Resonance अर्थात संयुग्मित अनुनाद या तत्त्वाचा वापर होतो. यामध्ये दोन मनोरे एकमेकांपासून काही अंतरावर बांधले जातात. त्यांचे पायाभाग (फाउंडेशन) किंवा अंतर्गत भिंती कंपनक्षम प्लॅटफॉर्मद्वारे जोडले जातात. त्यामुळे एका मनोऱ्यावर निर्माण होणाऱ्या कंपांचे प्रतिबिंब दुसऱ्या मनोऱ्यावर उमटते. हा सिद्धांत हार्मोनिक गतीवर आधारित असतो – म्हणजे एका घटकावर कंपन घडवले असता दुसरा घटक त्याच लयीत हलतो. फरकांडे येथील मनोरेही याच तंत्रावर आधारित असावेत, असे दिसते.
पिसाचा कलता मनोरा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात, तसेच आपणही फरकांडेचा झूलता मनोरा पाहायला पाहिजे – आणि जगाला सांगायला पाहिजे की, अशी अद्भुत रचना आमच्याकडे आहे!
आपले पर्यटन वाढवायचे असेल, तर आपण अधिक डोळसपणे आणि एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. आपण आपले दुसरे पाऊल इथे भेट देऊन आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहोचवून टाकूया.
चला तर मग फरकांडे जाऊया… झूलता मनोरा पाहूया!
– युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव