Sunday, October 5, 2025
HomeBlogमहाकुंभमेळ्यात भीषण आगीत १८ तंबू जळून खाक

महाकुंभमेळ्यात भीषण आगीत १८ तंबू जळून खाक

महाकुंभमेळ्यात भीषण आगीत १८ तंबू जळून खाक

प्रयागराज I वृत्तसंस्था

महाकुंभमेळ्यात रविवार १९ जानेवारी रोजी लागलेल्या भीषण आगीमध्ये १८ तंबू खाक झाल्याची घटना घडली असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील योगींकडून घटनेची माहिती घेतली.

 

कुंभमेळ्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रमोद शर्मा यांनीदिलेली माहिती अशी कि कुंभनगरीतील सेक्टर १९ मधील एका तंबूत स्वयंपाक सुरू असताना दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास एका सिलेंडरचा स्फोट झाला. या ठिकाणी गीता प्रेस या प्रकाशन संस्थेचे शिबीर आहे. आगीने आजूबाजूचे तंबू कवेत घेऊन क्षणात उग्ररूप धारण केले. आग लागल्याने इतर तंबूतील सिलिंडरचेदेखील पाठोपाठ स्फोट झाले.

आग लागलेल्या ठिकाणावर रेल्वे पूल आहे. खाली आगीचे लोळ उठत असताना पुलावरून रेल्वे जात असल्याचे काही व्हिडीओमध्ये दिसते. या आगीत १८ तंबू जळून राख झाले. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे १६ बंब लागले. आग लागल्याचे समजताच कुंभनगरीत एकच गोंधळ उडाला होता.

प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सेक्टर १९च्या आजूबाजूच्या सेक्टरमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. या आगीत गीता प्रेसचे लाखो रुपयांचे साहित्य जळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.रविवारपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार ८ कोटी १५ लाखांहून अधिक लोकांनी संगमावर स्नान केले

ताज्या बातम्या