Saturday, August 2, 2025
Homeक्राईमपाच हजाराची लाच घेताना काकोडा येथील तलाठ्यासह दोन जण एसीबीच्या जाळ्यात !

पाच हजाराची लाच घेताना काकोडा येथील तलाठ्यासह दोन जण एसीबीच्या जाळ्यात !

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-कुसुंबा येथील तलाठ्याला तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना अटक केल्याच्या दुसऱ्या दिवशी सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तालुक्यातील काकोडा येथील तलाठ्याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन पंटरासह जळगावच्या एसीबीच्या पथकाने 8 जानेवारी रोजी दुपारी अटक केली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

काकोडा तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे (42, रा.चिखली रानखांब, ता.मलकापूर, ह.मु.गणपती नगर, भाग, 5 मलकापूर) तसेच खाजगी पंटर अरुण शालीग्राम भोलानकार (32, कुर्‍हा, ता.मुक्ताईनगर)व संतोष प्रकाश उबरकर (25 कुर्‍हा, ता.मुक्ताईनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार जळगावातील तक्रारदार यांचे आजोबा यांचे नावे कुर्‍हा, ता. मुक्ताईनगर येथे शेत असून तक्रारदार यांचे आजोबा 1997 मध्ये मयत झाले असून तेव्हापासून तक्रारदार यांचे वडील, काका, आत्या व मयत काकांच्या मुलांचे यांचे 7/12 उतार्‍यावर नाव लावणे बाकी होते. त्यासाठी तक्रारदार यांनी 1 जानेवारी रोजी कुर्‍हा तलाठी यांची भेट घेतली असता त्यांनी प्रत्येक वर्षाचे 220 रुपये या प्रमाणे 6000 रुपये शासकीय फी भरावी लागेल, असे सांगितले व शासकीय फी भरायची नसेल तर मला पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली.

लाचेची रक्कम अरुण भोलानकर यांच्या सांगण्यावरून संतोष उबरकरने स्वीकारताच आधी दोघांना व नंतर तलाठ्याला अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
जळगाव पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, दिनेशसिंग पाटील, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

ताज्या बातम्या