Friday, June 20, 2025
Homeताज्या बातम्याअश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

मुंबई: I वृत्तसंस्था मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यस्थापकीय संचालक असलेल्याअश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिवपदी शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. भिडे यांनी तत्काळ पदभार स्वीकारावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने बदलीच्या आदेशात दिल्या आहेत. मेट्रोच्या व्यस्थापकीय संचालकपदाचा कार्यभारदेखील काही काळ त्यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मुख्यमंत्री प्रधान सचिव पदाची जवाबदारी ब्रिजेश सिंह यांच्याकडे होती; परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रधान सचिवपदाचा कारभार सिंह यांच्याकडून भिडे यांच्याकडे सोपवण्यात आला  आहे. ‘मेट्रो वूमन’ अशी भिडे यांची ओळख आहे. आरेतील वृक्षतोडीनंतर भिडे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यामुळे त्यांच्याकडून मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा कारभार काढून घेतला गेला होता.

मात्र, २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा ‘मेट्रो’चा कारभार भिडे यांच्याकडे सोपवला गेला. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात थेट प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांवर आलेल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी भिडे यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या