नारायण गावाजवळ भीषण अपघातामध्ये 9 जण जागीच ठार 8 जण जखमी
नारायणगाव वृत्तसंस्था आयशर टेम्पोने प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो व्हॅनला पाठीमागून जोराने धडक दिली. त्यानंतर ती मॅक्झिमो व्हॅन रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या एसटी बसला मागील बाजूने जोराने धडकल्याने झालेल्या अपघातात ९ जण ठार झाले, तर ८ जण जखमी झाल्याची घटना जुन्नर तालुक्यामधील नारायणगाव जवळ शुक्रवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास नारायणगावाजवळील मुक्ताई ढाब्याजवळ झाला. अपघातामध्ये मॅक्झिमो व्हॅनचा चक्काचूर झाला.
अपघातात देबूबाई दामू टाकळकर (६५, रा. वैशाखखेडे, ता. जुन्नर), विनोद केरुभाऊ रोकडे (५०, रा. कांदळी, ता. जुन्नर), युवराज महादेव वाव्हळ (२३, रा. १४ नंबर, कांदळी, ता. जुन्नर), चंद्रकांत कारभारी गुंजाळ (५७, रा. कांदळी, ता. जुन्नर), गीता बाबूराव गवारे (४५, रा. १४ नंबर, कांदळी, ता. जुन्नर), भाऊ रभाजी बढे (६५, रा. नगदवाडी, कांदळी, ता. जुन्नर), नजमा अहमद हनीफ शेख (३५, रा. गडही मैवान, राजगुरूनगर, ता. खेड), वशिफा वशिम इनामदार (२), मनीषा नानासाहेब पाचरणे (५६, रा. १४ नंबर, ता. जुन्नर) यांचा अपघातात मृत्यू झाला.
तर, त्रऋतुजा भरत पवार (२४), गणपत बजाबा घाडगे (४७), शुभम संतोष घाडगे (२४, रा. सर्वजण कांदळी, ता. जुन्नर), तस्लिम वसीम शेख (३०, रा. वडज, ता. जुन्नर), मर्जीना महम्मद हनीफ शेख (१६), आलिशा समीर शेख (१५, रा. सर्वजण राजगुरूनगर, ता. खेड), स्वाती भानुदास पुंडे (२९, रा. नारायणगाव, ता. जुन्नर), सुदर्शन किसन पोटकुले (३५, रा. आळेफाटा, ता. जुन्नर) हे अपघातात जखमी झाले आहेत.
नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक
विनोद रोकडे महादेव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक विनोद रोकडे हा आळेफाटा येथून प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो व्हॅनने (एमएच-१२-एचएफ ४३९३) नारायणगावच्या दिशेने चालला होता. या व्हॅनमध्ये १७ प्रवासी बसले होते. पुण्याच्या दिशेने चाललेल्या आयशर टेम्पो (एचआर-४७-एफ ५५९४) ने व्हॅनला मागून जोराने धडक दिल्याने ही व्हॅन समोर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या नाशिक-महाबळेश्वर एसटी बस (एमएच-१४-बीटी-३५७६) ला जाऊन धडकली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जणांचा ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इतर आठ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांवर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात, तर सुदर्शन पोटकुले हे नारायणगाव
ग्रामीण रुग्णालयात आणि शुभम घाडगे यांना भोसरी येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातात मृत्युमुखी झालेल्यांमध्ये ४ महिला, ४ पुरुष आणि एका दोन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
ग्रामीण रुग्णालयात व मॅक्स के अर हॉस्पिटलमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, भाजपच्या नेत्या आशा बुचके, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच योगेश बाबू पाटे, बाजार समितीच्या संचालिका प्रियंका महेश शेळके, सुरज वाजगे यांनी भेट देऊन सांत्वन केले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी भेट देऊन पाहणी केली.