देणगीपेक्षा गरजूंच्या जीवनातील आनंद महत्त्वाचा: कल्याण बॅनर्जी
जळगाव: सामाजिक कार्यासाठी दिलेल्या देणग्या किंवा निधीच्या रकमेपेक्षा गरजूंच्या जीवनात किती आनंद निर्माण झाला, हे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन रोटरीचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कल्याण बॅनर्जी यांनी केले. गांधीतीर्थ येथील जैन हिल्सच्या कस्तुरबा सभागृहात झालेल्या रोटरी क्लब जळगावच्या ७६ व्या पदग्रहण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे चेअरमन अशोक जैन आणि सहप्रांतपाल डॉ. अपर्णा भट-कासार यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना बॅनर्जी म्हणाले की, देशातील पहिला रोटरी क्लब कलकत्ता येथे स्थापन झाला असून, आज रोटरी सदस्यांची संख्या पाहता ही सर्वात वेगाने वाढणारी स्वयंसेवी संस्था आहे. सेवाकार्य करताना संख्यात्मक नव्हे, तर गुणात्मक दर्जा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी आपुलकी व्यक्त करत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांनी हे रोटरी वर्ष परिवर्तनाचे असून, रोटरी सेवेसाठी असल्याचे सांगितले. अशोक जैन यांनी गिरीश कुलकर्णींसारखा सामान्य कार्यकर्ता आज रोटरीचा अध्यक्ष होऊ शकतो, याबद्दल आनंद व्यक्त केला. रोटरॅक्ट या रोटरीच्या युवा संघटनेत केलेल्या कार्यांच्या आठवणींना उजाळा देत, रोटरी क्लब जळगावने मानद सदस्यत्व दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
या सोहळ्यात मावळते अध्यक्ष ॲड. सागर चित्रे यांनी गिरीश कुलकर्णी यांना अध्यक्षपदाची सूत्रे दिली, तर पराग अग्रवाल यांनी सुभाष अमळनेरकर आणि पंकज व्यवहारे यांना सचिवपदाची सूत्रे दिली. ॲड. सागर चित्रे यांनी कार्य अहवाल सादर करून सूत्रसंचालन केले. नूतन अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करत नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. त्यांच्या मातोश्री सुनंदा कुलकर्णी यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मृण्मयी कुलकर्णी हिने कथ्थक नृत्याद्वारे गणेशवंदना सादर केली. यावेळी कॅप्टन मोहन कुळकर्णी संपादित क्लब बुलेटीन ‘अजिंठा’ च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. प्रदीप जोशी आणि डॉ. अपर्णा भट-कासार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर ॲड. हेमंत भंगाळे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात जितेंद्र ढाके यांनी रोटरी फाउंडेशनच्या कार्यासाठी तीन लाख रुपयांचा, तर क्लबतर्फे करण्यात येणाऱ्या मोतीबिंदूंच्या मोफत शस्त्रक्रियांसाठी कवरलाल संघवी यांनी एक लाख रुपयांचा आणि विजय जोशी यांनी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
या पदग्रहण सोहळ्यास माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, राजीव शर्मा, राजेंद्र भामरे, डॉ. आरती व डॉ. संजीव हुजूरबाजार, इनरव्हीलच्या माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन संगिता घोडगावकर, सुदर्शन अय्यंगार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.