Sunday, June 15, 2025
Homeक्राईमसातपुड्यातील झऱ्यांचे प्रथमच जिओ-टॅगिंग

सातपुड्यातील झऱ्यांचे प्रथमच जिओ-टॅगिंग

सातपुड्यातील झऱ्यांचे प्रथमच जिओ-टॅगिंग

यावल वनविभागाचा नावीन्यपूर्ण उपक्रम

यावल, प्रतिनिधी l दि. १५ मे २०२५ l सातपुडा पर्वतरांगांतील हंगामी आणि बारमाही झऱ्यांची अचूक माहिती संकलित करण्यासाठी यावल (प्रादेशिक) वनविभाग आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जळगाव यांनी हाती घेतलेला अभिनव उपक्रम चर्चेचा विषय ठरला आहे. सातपुड्यात प्रथमच होणाऱ्या झऱ्यांच्या जिओ-टॅगिंगसाठी १४ वनरक्षकांना एन्ड्रॉइड मोबाइलद्वारे माहिती संकलनाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे झऱ्यांची स्थाननिहाय नोंदणी शक्य होणार असून, भविष्यात पाणीसाठा वाढवणे, पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन आणि जलसंधारणाच्या कामांना गती मिळणार आहे. प्रशिक्षण सत्रात भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे सहायक भूवैज्ञानिक सुधीर जैन आणि जीआयएस सहायक महेंद्र बाविस्कर यांनी जिओ-टॅगिंग अॅप्लिकेशनच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले,

ज्यामुळे वनरक्षकांना प्रक्रिया समजण्यास मदत झाली.उपवनसंरक्षक जमीर एम. शेख, सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे (वनीकरण व वन्यजीव, चोपडा) आणि समाधान पाटील (प्रादेशिक व केंम्पा, यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.

यावल आणि चोपडा वनपरिक्षेत्रातील प्रत्येकी दोन वनरक्षकांसह वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.वनविभागाने वनरक्षकांना जिओ-टॅगिंगसाठी वाहने, तांत्रिक साधने आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

तज्ज्ञांच्या मते, या जिओ-टॅगिंगमुळे मिळणारी माहिती सातपुड्यातील पर्यावरण संवर्धन आणि जलसाठा व्यवस्थापनासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हा उपक्रम स्थानिक पातळीवर जलसंधारणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.

ताज्या बातम्या