वाळू ट्रॅक्टर उलटून चालक ठार; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार
जळगाव, : धानोरा गावाजवळ वाळू घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात विश्वनाथ आधार भिल (वय १९, रा. शिरसोली, ता. जळगाव) या युवकाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी हा अपघात घडला.
विश्वनाथ भिल हा मोहाडी गावातील वाळू ट्रॅक्टरवर चालक म्हणून कार्यरत होता. सकाळच्या सुमारास ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करताना धानोरा येथील पोल्ट्री फार्मजवळ ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने तो उलटला. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून विश्वनाथचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या दुर्घटनेनंतर मृताचा एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाइकांनी रुग्णालयात जोरदार आक्रोश केला. ट्रॅक्टर मालकाने रुग्णालयात येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच, अपघातानंतर ट्रॅक्टर मालकाने मोबाइल बंद करून ठेवला, असा आरोपही नातेवाइकांनी केला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. मृत विश्वनाथ मागे आई-वडील असा परिवार आहे.