Friday, June 13, 2025
Homeखानदेश"लोकसभेनंतर आम्ही चिंतेत होतो, पण महाराष्ट्रात इतिहास घडवला" — गिरीश महाजन

“लोकसभेनंतर आम्ही चिंतेत होतो, पण महाराष्ट्रात इतिहास घडवला” — गिरीश महाजन

लोकसभेनंतर आम्ही चिंतेत होतो, पण महाराष्ट्रात इतिहास घडवला” — गिरीश महाजन

जळगाव (प्रतिनिधी) : “लोकसभा निवडणुकीत जनाधार आमच्या विरुद्ध गेल्याने आम्हीही चिंतेत होतो. मी तर बंगला सोडून तीन खोल्यांचा फ्लॅटही घेऊन टाकला होता. वाटलं आता सामान शिफ्ट करावं लागणार. पण ज्या पद्धतीने आपण मेहनत घेतली आणि पुन्हा उभारी घेतली, त्यामुळे महाराष्ट्रात इतिहास घडवता आला,” असे भावनिक उद्गार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

भाजपच्या जळगावमध्ये आयोजित कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महाजन बोलत होते. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.

भाजपच्या विस्तारावर भर :
महाजन म्हणाले, “जिल्ह्यात सर्वाधिक पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. त्याच धर्तीवर महापालिकांमध्येही सर्वाधिक नगरसेवक भाजपचे असले पाहिजेत. विशेषतः नाशिक महापालिकेतील १२५ जागांपैकी १०० जागा आपण जिंकल्या पाहिजेत. जळगाव आणि नाशिकमध्ये उच्चांक गाठायचा आहे.”

विरोधकांवर नाव न घेता निशाणा :
“बडबड करणाऱ्यांना कुणी विचारत नाही. आपल्यावर बोलूनच त्यांना प्रसिद्धी मिळते. त्यांची काय हालत आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे,” अशा शब्दांत त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टोला लगावला.

जळगाव भाजपचा बालेकिल्ला :
“लोकसभेत महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने आपल्याच दोन जागा निवडून आल्या. विधानसभेत ११ पैकी ११ आमदार निवडून आले. त्यामुळे जळगाव हा भाजप व महायुतीचा बालेकिल्ला बनला आहे,” असे महाजन यांनी ठामपणे सांगितले.

जिल्हा परिषदेसाठी लक्ष्य ५० जागांचे :
“जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला किमान ५० जागा जिंकायच्या आहेत. एकही जागा कमी चालणार नाही. महायुती झाली तर उत्तमच, पण कोणीतरी वेगळं उभं राहिलं तरी आपल्याला मागे हटायचं नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणाऱ्या या भाषणाने भाजपची पुढील निवडणुकांसाठीची दिशा स्पष्ट झाली असून, जिल्ह्यात पुन्हा एकदा पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार दिसून आला.

ताज्या बातम्या