नागपूर वृत्तसंस्था: महायुतीसाठी ‘गेमचेंजर’ ठरलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ साठी १४ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीसह एकूण ३५ हजार ७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सोमवारी हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आल्या.
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या पुरवणी मागण्या सादर केल्या. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुती सरकारने जुलै महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात विक्रमी ९४ हजार कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या होत्या. यावेळी सरकारने पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.