राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात; ऑक्टोबरमध्ये तीन टप्प्यांत मतदानाची शक्यता
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात असून, राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोग ऑक्टोबर महिन्यात निवडणूक वेळापत्रक जाहीर करू शकतो, अशी माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.
तीन टप्प्यांत होणार मतदान :
प्रशासकीय सोयी आणि नियोजन लक्षात घेता निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे संकेत वाघमारे यांनी दिले आहेत.
पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील मतदान पार पडेल.दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मतदानाचे आयोजन होईल.तिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि कोकण विभागांतील मतदान होणार आहे.
या निवडणुकीत राज्यातील २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद, आणि २८८ पंचायत समित्यांच्या सत्तासंघर्षाचा फैसला होणार आहे.
प्रभाग रचना आणि संभाव्य आव्हाने :
आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. अडीच- तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजी झालेल्या सुनावणीवेळी दिले होते. त्यामुळे निवडणुका ऑक्टोबरपर्यंत घेण्याचा आयोगाचा मानस आहे.एकाच टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ लाख ५० हजार ईव्हीएमची गरज भासणार आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त ६५ हजार ईव्हीएम आहेत. म्हणूनही तीन टप्प्यांत निवडणूक घेण्याची तयारी आयोग करत आहे.
वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता ऑक्टोबरमध्ये :
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यासाठी साधारणपणे तीन ते साडेतीन महिने लागतील. त्यामुळे ऑक्टोबर २०२५ मध्ये निवडणुका पार पडण्याचा अंदाज आहे.
राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सज्ज ठेवण्यास सुरुवात केली असून, या निवडणुकांचे राज्याच्या राजकीय समीकरणांवर मोठे परिणाम होणार आहेत.