मुक्ताई यात्रेमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या चौघांना अटक
फरार असलेल्या तीन जणांचा शोध सुरू
जळगाव प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील हे तिघे आणि त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. आरोपींना भुसावळ सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यातील तिघा संशयित आरोपींना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील यात्रोत्सवात अल्पवयीन मुलींच्या छेड काढल्याची घटना घडली होती या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली असून इतर तीन जणांचा पोलीस शोध घेत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावाच्या मुक्ताबाई यात्रेत फराळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेळी संशयित आरोपी अनिकेत भोई याने दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेचे सुमारास अल्पवयीन मुलींकडे बघून अश्लील हातवारे केले.होते.
यानंतर पीडित युवती व तिच्या मैत्रिणी दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे नऊ वाजेचे सुमारास कोथळी गावातील मुक्ताबाई यात्रेत फिरत असतांना संशयित आरोपी अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई, सचिन पालवे अशांनी पीडित युवती व तिच्या मैत्रिणीं अशांचा जाणीवपूर्वक पाठलाग करून गर्दीचा फायदा घेऊन संशयित आरोपी अनिकेत भोई याने पीडित युवतीस लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे स्पर्श केला व पीडित युवती व तिच्या मैत्रिणी त्यांच्या कडील मोबाईल मध्ये व्हिडिओ काढला होता. म्हणून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता सह बाल लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.