Wednesday, April 29, 2026
Homeक्राईममध्यप्रदेशातून गावठी पिस्तूल पुरवठा करणारे रॅकेट उद्ध्वस्त; सात जणांना बेड्या

मध्यप्रदेशातून गावठी पिस्तूल पुरवठा करणारे रॅकेट उद्ध्वस्त; सात जणांना बेड्या

मध्यप्रदेशातून गावठी पिस्तूल पुरवठा करणारे रॅकेट उद्ध्वस्त; सात जणांना बेड्या

जिल्हापेठ पोलिसांची मोठी कारवाई; ८ पिस्तूल, १० जिवंत काडतुसे व दुचाकी जप्त

जळगाव | प्रतिनिधी

जिल्हापेठ पोलिसांनी धाडसी कारवाई करत मध्यप्रदेशातून गावठी पिस्तूल आणून जळगाव जिल्ह्यात विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी टोळीच्या म्होरक्यासह सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ८ गावठी पिस्तूल, १० जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

​जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, १ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास या मोहिमेला सुरुवात झाली. जळगाव शहरातील  भजे गल्ली परिसरात यश रामदास नन्नवरे हा तरुण बेकायदेशीर पिस्तूल बाळगत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये एक गावठी पिस्तूल आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक करून पोलिसी खाक्या दाखवला.

अशी उघड झाली साखळी

यश नन्नवरे याच्या चौकशीतून या रॅकेटचे धागेदोरे वरणगाव (ता. भुसावळ) येथील केशव सुनील भालेराव याच्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी तत्काळ केशव याला ताब्यात घेतले असता, त्याने हे पिस्तूल समाधान बळीराम निकम (रा. अंजाळे, ता. यावल) याच्याकडून घेतल्याचे कबूल केले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मुख्य सूत्रधार समाधान निकम याचा शोध घेतला असता तो जामनेर तालुक्यातील नेरी येथे सापडला. त्याने मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून जिल्ह्यात विविध ठिकाणी विक्री केल्याची कबुली दिली.

सात आरोपी गजाआड

या कारवाईत पोलिसांनी यश नन्नवरे (जळगाव), केशव भालेराव (वरणगाव), गौरव साळवे (पिंप्राळा), समाधान निकम (यावल), विकास काकडे (बोदवड), जगदीश महाजन (बुरहानपूर, मध्यप्रदेश) आणि कैलास माळी (धुळे) अशा सात जणांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये ८ पिस्तूल, १० काडतुसे आणि एक होंडा युनिकॉर्न दुचाकीचा समावेश आहे.

फरार गुन्हेगारही जाळ्यात

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी तीन जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. मुख्य संशयित समाधान निकम हा पाचोरा पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. तसेच यावल पोलीस ठाण्यातील आर्म ॲक्टच्या गुन्ह्यातही तो हवा होता. केशव भालेराव हादेखील वरणगाव येथील एका गुन्ह्यात पोलिसांना हवा होता. या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या