Sunday, June 15, 2025
Homeक्राईमबस प्रवासात दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक

बस प्रवासात दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक

बस प्रवासात दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक

अमळनेर प्रतिनिधी

बसमधील प्रवाशाच्या पर्समधून सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या दोन महिलांना अमळनेर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सततच्या शोध मोहिमेनंतर अटक केली आहे. या प्रकरणात चोरीस गेलेले दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत.

६ मार्च २०२५ रोजी दुपारी २ वाजता, प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८, रा. गारखेडे, ता. धरणगाव) या जळगाव-दोंडाईचा बसने वाघोदे (ता. शिंदखेडा) येथे जात असताना ही घटना घडली. त्यांच्या पर्समध्ये दोन सोन्याच्या बांगड्या आणि मंगळसूत्र होते. प्रवासादरम्यान दोन अनोळखी महिला त्यांच्या शेजारी बसल्या होत्या.

चोपडा नाका स्टॉपवर त्या महिला उतरल्या. त्यानंतर प्रतिभा पाटील यांनी पर्स तपासली असता दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते आणि परी उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

गुप्त माहितीच्या आधारे आरोपी महिलांचे वारंवार ठिकाण बदलण्याचे पैतृक जाळे उघड झाले. त्या जळगाव, अकोला, बार्शी टाकळी, परतवाडा तसेच मध्य प्रदेशातील तिगाव, पांडुरणा आणि इंदूर येथे लपून राहत होत्या. अखेर पोलिसांनी सतत पाठलाग करून वरुड (ता. वरुड, जि. अमरावती) येथे आठवडी बाजारात आरोपींना ताब्यात घेतले. : गंगा चैना हातगळे (वय ४०, रा. नेताजी नगर, यवतमाळ) , गंगा सुभाष नाडे (वय ४५, रा. नेताजी नगर, यवतमाळ) अशी या दोन महिलांची नावे असून त्या दोघींनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

गेल्या ८-९ दिवसांपासून पोलिसांनी या आरोपींचा शोध घेत मोठे यश मिळवले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक साधनांचा वापर करून पोलिसांनी गुन्हेगारांना गजाआड केले. या यशस्वी कारवाईमुळे प्रवाशांमध्ये विश्वास वाढला असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

ताज्या बातम्या