Wednesday, April 15, 2026
Homeक्राईमपेट्रोलपंप दरोडाप्रकरणी पाच सराईत गुन्हेगार जेरबंद !

पेट्रोलपंप दरोडाप्रकरणी पाच सराईत गुन्हेगार जेरबंद !

पेट्रोल पंप दरोडाप्रकरणी पाच सराईत गुन्हेगार जेरबंद !

आरोपींकडून रोकडसह शस्त्र जप्त ; एलसीबीची कारवाई

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर झालेल्या सशस्त्र दरोड्याचा अखेर जळगाव गुन्हे शाखेने चार दिवसांच्या अतिशय काटेकोर तपासानंतर पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात भुसावळ आणि अकोला तालुक्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मुक्ताईनगर येथील रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला होता. त्यानंतर या दरोडेखोरांनी सलग कर्की फाटा (ता. मुक्ताईनगर) येथील मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप आणि वरणगाव शिवारातील सैय्यद पेट्रोल पंप यांनाही लुटले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून डीव्हीआर चोरला आणि तब्बल एक लाख ३३ हजार रुपयांची रोकड घेऊन फरार झाले.

अटक झालेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
सचिन अरविंद भालेराव (३५, भुसावळ, मूळ रा. खकनार, जि. बुर्‍हाणपूर, म.प्र.), पंकज मोहन गायकवाड (२३, वेडीमाता मंदिर, जुना सातारा रोड, भुसावळ), हर्षल अनिल बावस्कर (२१, बाळापूर, जि. अकोला), देवेंद्र अनिल बावस्कर (२३, बाळापूर, जि. अकोला) आणि प्रदुम्न दिनेश विरघट (१९, श्रद्धा नगर, कौलखेड, अकोला).

मोठा शस्त्रसाठा आणि रोख जप्त:
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ४० हजार रुपयांची रोकड, तीन गावठी पिस्तुले, पाच मॅगझिन, नऊ मोबाईल फोन आणि एक निळ्या रंगाची सॅक बॅग जप्त केली आहे.

गुन्हे शाखेचा सखोल तपास:
जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि भुसावळचे उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे व ग्रेडेड पीएसआय रवी नरवाडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांनी चार आरोपींना नाशिकहून तर एक आरोपी व त्याचा अल्पवयीन साथीदार अकोल्यातून अटक केला.

मुख्य आरोपीवर आधीच गुन्हे नोंद:
अटकेतील मुख्य आरोपी सचिन भालेराव याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि दंगा करणे या दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच, २०२४ मध्ये महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार त्याला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या