पुण्यात मिनी बसला आग ; चौघांचा होरपळून मृत्यू
सहा गंभीर : हिंजवडीतील हृदयद्रावक घटना
पुणे वृत्तसंस्था
कामावरून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एका मिनी बसला लागलेल्या आगे चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंजवडी येथे घडली असून अन्य सहा जण गंभीर जखमी झाले. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र व्यक्त होत आहे.
सुभाष सुरेश भोसले (४४), शंकर कोंडीबा शिंदे (६३), गुरुदास खंडू लोखरे (४५), राजन सिद्धार्थ चव्हाण (४२) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. प्रदीप राऊत, प्रवीण निकम, चंद्रकांत मलजीत, संदीप शिदि, विश्वनाथ झोरी, वाहनचालक जनार्दन हंबारिडकर अशी जखमीची नावे आहेत.
हे सर्वजण हिंजवडी फेज २ येथील तिरुमाला इंडस्ट्रियल इस्टेट येथील व्योम ग्राफिक्स या कंपनीत कामाला होते. बुधवारी सकाळी वाहनचालक जनार्दन हंबारिडकर हे १४ कर्मचाऱ्यांना कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलरने पीकअप करून कंपनीच्या दिशेने जात होते. सकाळी बस विप्रो सर्कलच्या पुढे आली असता शॉर्टसर्किटमुळे तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर ड्रायव्हर सीटच्या पायाजवळ आग लागली. आगीचा भडका उडाला आणि हंबारिडकर यांच्या कपड्याने पेट घेतला. त्यानंतर आग पाठीमागील दिशेने भडकू लागली. दरम्यान, पुढील बाजूस बसलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ गाडीबाहेर धाव घेतली. त्यानंतर क्षणात बसने पूर्ण पेट घेतला. खाली उतरण्याच्या प्रयत्नात असलेले सहा कामगार गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. यातील वाहनचालकासह एका कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे.