पुणे बलात्कार प्रकरणात वैद्यकीय अहवालातून धक्कादायक बाब समोर , एकदा नव्हे तर..
तरुणीवर अत्याचार करणारा नराधम बड्या नेत्याचा कार्यकर्ता, पोलिसांशी ओळखी
एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर
पुणे वृत्तसंस्था संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडली. तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे, ससून रुग्णालयानं हा वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे पाठवला आहे.
पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. दत्तात्रय गाडे या सराईत गुन्हेगाराने फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून तिला शिवशाही बसमध्ये नेले होते आणि तिच्यावर बलात्कार केला होता. दत्तात्रय गाडे याने या तरुणीवर एकदा नव्हे तर दोनवेळा बलात्कार केल्याची धक्कादायक बाब तरुणीच्या वैद्यकीय तपासणीतून समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून दत्तात्रय गाडे याचा शोध सुरु असून तो अद्याप फरार आहे. त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
पोलिस असल्याची बतावणी
इनशर्ट, शूज, मास्क अशा वेषात तो याठिकाणी यायचा. अनेकांना तो आपण पोलीस असल्याचे भासवायचा. पोलीस असल्याचे सांगून दत्तात्रय गाडे याने अनेक मुलींना यापूर्वी आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याशिवाय, तो एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याचीही माहिती समोर आली आहे.
दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी एकूण 13 पथके कामाला लावली आहेत. दत्तात्रय गाडे हा पुण्यालगत असलेल्या शेतांमध्ये लपला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांकडून डॉग स्क्वॉडची मदत घेऊन तपास केला जात आहे.