पाकमध्ये १७ वर्षीय इन्फ्लुएंसर सना युसूफची हत्या
एकतर्फी प्रेमातून घडले हत्याकांड
इस्लामाबाद: पाकिस्तानातील १७ वर्षीय लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सना युसूफची राजधानी इस्लामाबादमध्ये राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सनावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने हे हत्याकांड घडविले. सातत्याने प्रेमास नकार दिल्याने जवळचा नातेवाईक बनून घरात घुसत त्याने सनाला जीवे मारले. या घटनेमुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत हल्लेखोराला बेड्या ठोकल्या आहेत. आता त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी देशभरातून होत आहे.
पाकिस्तानच्या आदिवासीबहुल खैबर पख्तुनख्वाँ प्रांतातील चित्राल येथे राहणारी लोकप्रिय टिकटॉकर तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सना युसूफने अल्पावधितच लोकप्रियतेचे उच्च शिखर गाठले होते. इन्स्टाग्रामवर तिचे ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अशातच एक दहावी पास व बेरोजगार तरुण तिच्या प्रेमात पडला. हा तरुण गरीब घरातील होता. त्याने सनाला अनेकदा प्रपोज केले. मात्र, सनाने प्रेमास नकार दिला. ही बाब जिव्हारी लागल्याने जवळचा नातेवाईक बनून एकतर्फी प्रेम करणारा प्रियकर सोमवारी सायंकाळी सनाच्या इस्लामाबादस्थित सेक्टर जी-१३ मध्ये घरी भेटण्यासाठी आला. यावेळी त्याने सनावर अगदी जवळून अनेक गोळ्या झाडल्या. यात सना जागीच मरण पावली, अशी माहिती इस्लामाबादचे पोलीस महासंचालक सय्यद अली नासीर रिजवी यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच सनाने वाढदिवस
साजरा केला होता. सोमवारी सायंकाळी ती घरात होती. तेव्हा हल्लेखोराने सनावर तिच्या आईपुढेच गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे पाकिस्तानात एकच खळबळ माजली आहे. सध्या सना युसूफचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, असे अधिकारी महणाले. दरम्यान, सना युसूफला जीवे मारल्यानंतर हल्लेखोर नातेवाइकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याला फैसलाबाद येथे अटक केली. त्याने सनाला जीवे मारल्याची कबुली दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष बाब अशी की, सना युसूफ एक उदयोन्मुख डिजिटल स्टार होती. लाइफस्टाइल कंटेंट, चित्राल कल्चर आणि महिला अधिकार तसेच स्त्रीशिक्षणाचा ती प्रसार करीत होती. प्रामुख्याने युवा पाकिस्तानी व मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी ती मोटिवेशनल कंटेंट शेअर करायची. त्यामुळे पाकच्या तरुणाईसाठी ती मुख्य आकर्षण बनली होती; परंतु सनासारख्या हरहुन्नरी तरुण महिला स्टारचा एकतर्फी प्रेमातून दुर्दैवी अंत झाला आहे.