Tuesday, July 8, 2025
Homeक्राईमदरोडा टाकण्याच्या तयारीत असलेला गोवंश चोरटा जेरबंद; इनोव्हा कारसह एक बैल व...

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेला गोवंश चोरटा जेरबंद; इनोव्हा कारसह एक बैल व शस्त्रसाठा जप्त

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेला गोवंश चोरटा जेरबंद; इनोव्हा कारसह एक बैल व शस्त्रसाठा जप्त

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हागस्ती दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गोवंश चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत स्थायी गुन्हे शाखा, जळगावने मोठी कारवाई केली आहे. पोलीसांनी इनोव्हा कारसह चोरी केलेला बैल, धारदार शस्त्रे आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले असून एक आरोपीला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

दि. १५ जून रोजी रात्री ११ वाजल्यापासून १६ जूनच्या पहाटेपर्यंत सुरू असलेल्या जिल्हागस्ती दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. मुक्ताईनगर तालुक्यातील हडोतोल कुंड परिसरात इनोव्हा कारमधून आलेले चारजण दरोडा टाकण्यासाठी एका घराच्या दिशेने जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांचे वाहन पाहताच संशयितांनी पळ काढला.

पोलीसांनी तत्काळ पाठलाग सुरू करत मलकापूर, नांदुरा, अकोला या मार्गांवर नियंत्रणकक्षांना माहिती दिली. अखेर अकोला जिल्ह्यातील रिधोरा शिवारात १६ जून रोजी पहाटे ३.४० वाजता नागपूर-धुळे महामार्गावर नाकाबंदी करून पोलिसांनी इनोव्हा कार रोखली. दरम्यान, वाहनातील तीन आरोपी आणि चालकासह चौघे पळून गेले. मात्र, इनोव्हा कार चालक अरबाज खान फिरोज खान (वय २३, रा. खदान, हैदरपुरा, अकोला) यास पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली.

सदर कारमधून एक चोरीचा काळा बैल, एक तानबार, गुप्ती, चाकू, लोखंडी रॉड, दोर व कपड्यांसह गुन्ह्यात वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. इनोव्हा कारने पाठलाग थांबविण्याचा इशारा देऊनही थांबण्यास नकार दिल्याने पोलिसांच्या शासकीय वाहनावर कट मारून पोलिस अधिकाऱ्यांच्या जिवीत धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना किरकोळ दुखापत झाली.

या कारवाईनंतर उर्वरित आरोपींची नावे पुढीलप्रमाणे उघडकीस आली आहेत :

1. सय्यद फिरोन उर्फ अंकुल (रा. अनुमपुरा, कसारखेडा, बाळापूर)

2. अफजल सय्यद (रा. काली पाणीपुरा, बाळापूर)

3. इमरान (रा. विकुंड नदी, कसारखेडा)

4. तन्नू उर्फ तंचौर (रा. काली धाणी, बाळापूर)

5. अफरोज खान उर्फ अण्या (रा. अकोट फाईल, अकोला)

 

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या यशस्वी मोहिमेत सहभागी झालेल्या संदीप पाटील, शरद बागल, अनिल जाधव, दर्शन ढाकणे, नरवाडे, दामोदरे, विजय पाटील, अक्रम शेख, श्रीकृष्ण देशमुख, भरत पाटील, तसेच अकोला पोलीस स्टेशनचे करणकर, शिंदे, पोधाडे यांचे पोलीस अधीक्षकांकडून कौतुक करण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्ह्यात वाढत चाललेल्या गोवंश चोरी आणि दरोड्याच्या घटनांना रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या