Friday, June 13, 2025
Homeक्राईमटॉवेल कारखान्याला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू

टॉवेल कारखान्याला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू

सोलापूर: टॉवेल कारखान्याला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू

मालक-कुटुंबीयांसह 3 कामगारांचा समावेश

सोलापूर प्रतिनिधी येथील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल टेक्स्टाईल मिल टॉवेल कारखान्याला रविवारी (दि. 18 मे 2025) पहाटे लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

मृतांमध्ये कारखान्याचे मालक उस्मान हासन मन्सुरी (78), त्यांच्या कुटुंबातील शिफा अनस मन्सुरी (24), युसूफ अनस मन्सुरी (1), अनस हनिफ मन्सुरी (24, सर्व रा. अक्कलकोट रोड, एमआयडीसी), तसेच कामगार आयेशाबानो महताब बागवान (52, रा. गवळी वस्ती, एमआयडीसी), महताब बागवान (51), हिना बागवान (35) आणि सलमान बागवान (18) यांचा समावेश आहे

.हा कारखाना 3 ते 4 एकर परिसरात पसरलेला असून, दोन मजली इमारतीत आहे. येथे 300 ते 400 कामगार तीन पाळ्यांमध्ये काम करतात. कारखान्यात तयार होणारे टॉवेल परदेशात निर्यात केले जातात. मालक उस्मान मन्सुरी यांचा मुलगा मुंबईतून निर्यातीचे काम पाहतो, तर मन्सुरी कुटुंबीय कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होते. शनिवारी रात्री उस्मान मन्सुरी मुंबईहून सोलापुरात आले होते.

रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कारखान्याला आग लागली.आगीची माहिती मिळताच कारखान्यातील सुरक्षा रक्षकांनी अग्निशामक दलाला कळवले. अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या, परंतु आगीदरम्यान झालेल्या मोठ्या स्फोटामुळे आग आणखी भडकली. कारखान्यातील अरुंद रस्त्यांमुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी आल्या.

अग्निशामक दलाचे अधीक्षक राकेश सांळुखे यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी उंच शिडीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू केले. सकाळी तीन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेणे सुरू होते. धुराचे लोट आणि तीव्र आगीमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. सुमारे 14 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर उर्वरित पाच मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.सर्व मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले,

जिथे रात्री उशिरापर्यंत पंचनामे सुरू होते. मृतांच्या नातेवाइकांनी आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू असून, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ताज्या बातम्या