जळगावात लाचखोर भूकरमापक जाळ्यात, ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
जळगाव, : जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 26 मार्च रोजी कारवाईत भूकरमापकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तालुक्यातील निंभोरा गावात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय ४८), जो रावेर येथील भूमी अभिलेख कार्यालयात भूकरमापक म्हणून कार्यरत आहे, त्याला ४ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. मस्कावद (ता. रावेर) येथील एका ३० वर्षीय शेतकऱ्याने ४ मार्च २०२५ रोजी या प्रकरणाची तक्रार नोंदवली होती. तक्रारदार आणि त्यांच्या काकांची मस्कावद येथे संयुक्त शेतजमीन आहे. या जमिनीच्या मोजमापासाठी त्यांनी ७ जानेवारी २०२५ रोजी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज सादर केला होता. १८ फेब्रुवारी रोजी राजेंद्र कुलकर्णी यांनी शेताचे मोजमाप केले, पण मोजमापाच्या खुणा दाखवण्याच्या बहाण्याने त्यांनी ५,५०० रुपयांची लाच मागितली. शेतकऱ्याने पैसे नसल्याचे सांगितल्यावर, कुलकर्णी यांनी चक्क हरभऱ्याच्या स्वरूपात लाच देण्याचा अजब प्रस्ताव ठेवला. मात्र, तक्रारदाराने हे मान्य न करता थेट लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली.
विभागाने पडताळणी केली असता, कुलकर्णी यांनी आधी ५,५००, मग ५,००० आणि शेवटी ४,००० रुपयांवर तडजोड केली. अखेर आज, २६ मार्च रोजी निंभोरा येथील एका शेताजवळ तक्रारदाराकडून ४,००० रुपये स्वीकारताना कुलकर्णी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि अमोल सूर्यवंशी यांनी मोलाची साथ दिली. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन यशस्वी झाले.
या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही शासकीय अधिकारी लाच मागत असल्यास त्वरित ०२५७-२२३५४७७ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा. या कारवाईमुळे लाचखोरीला आळा बसण्याची आशा व्यक्त केली जात आहे.