ग्राहक वळविल्याचा आरोप करत तरुणाच्या डोक्यात माप फेकले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव, प्रतिनिधी : आमच्या दुकानाचे ग्राहक तुम्ही वळविले, या कारणावरून शेजारील दुकानदाराने तरुणाच्या डोक्यात एक किलोचे माप मारून जखमी केल्याची घटना कासमवाडी परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीद अकिल खाटीक यांचे कासमवाडी परिसरात दुकान आहे. १० मे रोजी त्यांच्याकडे शेजारील दुकानदार आला आणि “तुमच्यामुळे आमचे ग्राहक कमी झालेत, तुम्ही आमचे ग्राहक वळविले,” असा आरोप करत अचानक रागाच्या भरात एक किलो वजनाचे माप त्यांच्या डोक्यात फेकले. यामुळे नवीद यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्याचवेळी तेथे आणखी एक इसम आला व त्याने नवीद व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली.
या प्रकरणी नवीद खाटीक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी दोघांविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव मोरे करीत आहेत.