आईसोबत जेवणानंतर तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या; एकुलत्या मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुखाचा डोंगर
जळगाव : अयोध्या नगरातील ३२ वर्षीय योगेश लीलाधर वाघोदे याने मंगळवारी (दि. १३ मे) आईसोबत जेवण केल्यानंतर बाहेर जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपवली. विष प्राशन केल्यानंतर तो घरी परतला आणि दारात बसलेल्या आईजवळ येऊन बसला. काही वेळातच त्याची प्रकृती खालावली आणि तो खाली कोसळला. या धक्कादायक घटनेने अयोध्या नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
योगेश हा एका खासगी कंपनीत नोकरी करत होता आणि आई, पत्नी व मुलासह अयोध्या नगरात राहत होता. गेल्या सहा महिन्यांपासून त्याची पत्नी मुलासह माहेरी गेली होती. मंगळवारी रात्री जेवणानंतर योगेश बाहेर गेला आणि काही वेळाने घरी परतला. दारात बसलेल्या आईजवळ तो बसला, तेव्हा आईला त्याने मद्यपान केल्याचा संशय आला. त्याने आईला मागे सरकण्यास सांगितले, पण अचानक त्याला उलट्या सुरू झाल्या.
आईने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे १२:४० वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
योगेश अवघ्या दहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून त्याच्या आईने अथक परिश्रम करून त्याचे संगोपन केले. घरातील कर्ता पुरुष आणि एकुलता एक मुलगा असलेल्या योगेशच्या अचानक निधनाने त्याच्या आईवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. वृद्धावस्थेत आधार हरवल्याने कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.